पाकिस्तान आणि युएई यांच्यामध्ये आज रात्री 8 वाजता दुबईमध्ये सामना होणार होता, या सामन्यासाठी युएईची टीम हॉटेलमधून स्टेडियममध्येही पोहोचली आहे, पण पाकिस्तानचे खेळाडू मात्र अजूनही हॉटेलमध्येच आहेत. पाकिस्तानने या सामन्यातून माघार घेतल्यामुळे आता आयसीसी त्यांच्यावर काय कारवाई करणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. ही मागणी मान्य झाली नाही तर युएईविरुद्ध खेळणार नसल्याची धमकी पाकिस्तानने दिली होती. आयसीसीने पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची पीसीबीची मागणी मान्य केली नाही, त्यामुळे पाकिस्तानने युएईविरुद्ध खेळायला नकार दिला आहे. पाकिस्तान-युएई सामन्यामध्ये पायक्रॉफ्ट हेच मॅच रेफ्री होते.
advertisement
काय झाला वाद?
रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेटने विजय झाला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा टॉससाठी आले, तेव्हा मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांनी हस्तांदोलन होणार नसल्याचं सांगितलं. सामना संपल्यानंतरही भारतीय टीमने हस्तांदोलन केलं नाही, त्यामुळे अपमान झाल्याची तक्रार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली आहे.
'आयसीसीने नियुक्त केलेल्या मॅच रेफरींनी खेळ भावना आणि कायद्यांचे स्पष्टपणे उल्लंघन केलं आहे. मॅच रेफरींचं हे वर्तन चिंताजनक आहे. मॅच रेफरी त्यांची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. मॅच रेफरीचं काम दोन्ही टीममधला आदर कसा वाढेल? हे पाहणं आहे, पण त्यांनी एका टीमची बाजू घेतली', असं पत्र पीसीबीने आयसीसीला लिहिलं. आयसीसीने मात्र पायक्रॉफ्ट यांना बाजूला करण्याची पीसीबीची मागणी फेटाळून लावली