2009 नंतर पहिल्यांदाच असं घडलं
या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. प्रथम झिम्बाब्वेने त्यांना पराभूत केले आणि त्यानंतर श्रीलंका टीमनेही ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. सुपर-8 मध्ये पोहोचण्याच्या थोड्याफार आशा शिल्लक होत्या, मात्र आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील मॅच पावसामुळे रद्द झाली आणि ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले. 2009 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन टीम पहिल्याच राउंडमधून बाहेर पडली असून, यामुळे त्यांच्या आयसीसी रँकिंगवर मोठा परिणाम झाला आहे.
advertisement
जर न्यूझीलंडने सेमीफायनलपर्यंत मजल मारली तर....
लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये पुरुषांच्या टी20 क्रिकेटसाठी केवळ 6 टीम्स निवडल्या जाणार आहेत. या टीम्सची निवड महाद्वीपीय क्वालिफिकेशन सिस्टम किंवा आयसीसी रँकिंगच्या आधारावर होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची रँकिंग न्यूझीलंडपेक्षा चांगली होती. मात्र, आता लवकर बाहेर पडल्यामुळे न्यूझीलंडकडे ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्याची मोठी संधी आहे. जर न्यूझीलंडने या स्पर्धेत सेमीफायनलपर्यंत मजल मारली, तर ते ऑलिम्पिकसाठी थेट क्वालिफाय करू शकतात.
क्रिकेट विश्वासाठी मोठी गोष्ट
जर न्यूझीलंड रँकिंगमध्ये पुढे गेला, तर ऑस्ट्रेलियाला ऑलिम्पिकमधील शेवटच्या एका जागेसाठी इतर दुसऱ्या क्रमांकाच्या टीम्ससोबत वेगळी क्वालिफिकेशन टूर्नामेंट खेळावी लागेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी हा एक मोठा वैयक्तिक धक्का ठरू शकतो, कारण क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी त्यांनी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले आहेत. 1900 नंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट परतत असताना, ऑस्ट्रेलियासारखी मोठी टीम त्यातून बाहेर राहणे ही क्रिकेट विश्वासाठी मोठी गोष्ट असेल.
दिग्गज खेळाडू ऑलिम्पिकसाठी उत्सुक
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे अनेक दिग्गज खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहेत. स्टीव्ह स्मिथने अलीकडेच सांगितले होते की, ऑलिम्पिक टीमचा भाग बनणे हे त्याचे मुख्य ध्येय आहे. कॅप्टन पॅट कमिन्सने देखील ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे हा मोठा सन्मान असल्याचे म्हटले होते. आता या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागणार आहे, हे मात्र निश्चित झाले आहे.
