बांगलादेश सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल स्पोर्ट्स काऊन्सिलने एका समितीची स्थापना केली होती, जी पुढच्या निवडणुकीपर्यंत बोर्डाचं दैनंदिन कामकाज पाहणार आहे. त्यातच आता बांगलादेशचा माजी क्रिकेटपटू तमीम इक्बाल याची बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 37 वर्षांचा तमीम इक्बाल बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा सगळ्यात तरुण अध्यक्ष बनला आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार अमीनुल इस्लाम बुलबुल यांना अध्यक्षपदावरून हटवण्याचं मुख्य कारण टी-20 वर्ल्ड कपवेळी झालेला वाद आहे. त्यावेळी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार आसिफ नजरुल बांगलादेश क्रिकेट टीमला टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतात पाठवण्याच्या मताचे नव्हते.
advertisement
टी-20 वर्ल्ड कपमधले बांगलादेशचे सामने कोलकाता आणि मुंबईऐवजी श्रीलंकेमध्ये खेळवले जावेत, अशी मागणी नजरुल यांनी केली होती. मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून हटवल्याचा विरोध म्हणून नजरुल यांनी ही भूमिका घेतली, पण बांगलादेशची ही मागणी आयसीसीने मान्य केली नाही, त्यामुळे त्यांनी टी-20 वर्ल्ड कपवरच बहिष्कार टाकला. मागच्या काही दिवसांमध्ये बीसीबीच्या 6 डायरेक्टरनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
पुढच्या 90 दिवसांमध्ये निवडणुका
बांगलादेश क्रिकेट बोर्डामध्ये पुढच्या 90 दिवसांमध्ये निवडणुका होणार आहेत. तमीम इक्बाल 11 सदस्यीय समितीचं नेतृत्वही करेल, ज्याचं काम बोर्डाच्या निवडणुका योग्य पद्धतीने करणं असेल. बोर्डाचे सध्याचे अध्यक्ष बरखास्त करण्यात आल्याची सूचनाही आयसीसीला देण्यात आली आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार बोर्डाच्या अंतर्गत कामकाजामध्ये सरकारी हस्तक्षेप करायला परवानगी नाही, पण आयसीसी बांगलादेश क्रिकेट बोर्डावर याप्रकरणी कारवाई करण्याची शक्यता कमी आहे, कारण नॅशनल स्पोर्ट्स काऊन्सिलने आधीच निवडणुका जाहीर केल्या आहेत.
तमीम इक्बालमुळे सचिन-द्रविडला वेदना
तमीम इक्बाल 2007 च्या बांगलादेशच्या वनडे वर्ल्ड कप टीमचा भाग होता. याच टीमने ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला होता. बांगलादेशविरुद्धच्या या पराभवामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड कपमधलं आव्हान ग्रुप स्टेजलाच संपुष्टात आलं होतं. भारताविरुद्धच्या या सामन्यात तमीम इक्बालने 51 रनची मॅच विनिंग खेळी केली होती.
