बांगलादेशने वर्ल्ड कपमधून माघार घेण्याची अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी आयसीसी याबद्दल लवकरच काही महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाला त्यांचा मनमानीची किंमत मोजावी लागणार, हे जवळपास निश्चित आहे.
बांगलादेशला त्यांचे टी-20 वर्ल्ड कपचे सामने भारतात खेळावे लागतील, असं आयसीसीने आधीच स्पष्ट केलं होतं. तसंच आयसीसीने बांगलादेशला अंतिम निर्णय घेण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली होती, जी आता संपली आहे. दरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंसोबत बैठक घेतली, ज्यात त्यांनी टीमला भारतात पाठवायला नकार दिला, त्यामुळे आता बांगलादेशची टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता मावळली आहे.
advertisement
बांगलादेशवर कारवाई होणार?
दरम्यान, आयसीसी हे प्रकरण खूप गांभीर्याने घेत आहे. जर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अजूनही आपली टीम भारतात पाठवण्यास नकार दिला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं वृत्त समोर आलं आहे. आयसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष जय शाह सध्या दुबईमध्ये आहेत, जिथे आयसीसीचे मुख्यालय आहे. तेथे एक रणनीती आखली जात आहे. या प्रकरणात अशी कारवाई केली जाईल जी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला पुढील काही वर्षे लक्षात राहील.
बांगलादेशवर बंदीची टांगती तलवार
दरम्यान, मीडिया रिपोर्ट्स प्रसारित होत आहेत की बांगलादेश क्रिकेट बोर्डावर आयसीसीकडून बंदी घातली जाऊ शकते. याचा अर्थ पुढील काही वर्षे बांगलादेश कोणत्याही आयसीसी स्पर्धेत सहभागी होणार नाही. गेल्या चार-पाच दिवसांत जे घडले आहे त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की बांगलादेश क्रिकेट बोर्ड सरकारद्वारे चालवले जाते, जे आयसीसीच्या नियमांविरुद्ध आहे. याआधीही एखाद्या देशाच्या सरकारद्वारे क्रिकेट बोर्ड चालवलं जात असेल, तर त्याच्यावर आयसीसीकडून बंदी घातली जाते, त्यामुळे आता बांगलादेश क्रिकेटवरही बंदीची टांगती तलवार आहे.
दरम्यान, टी-20 वर्ल्ड कपबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अंतिम निर्णय घेतला असला तरी, आयसीसीने अद्याप बांगलादेशच्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. स्कॉटलंडचा प्रवेश देखील अद्याप जाहीर केला गेलेला नाही. यासंदर्भात आयसीसी कधीही घोषणा करू शकते, पण आयसीसीच्या या घोषणेनंतर बांगलादेश क्रिकेटचं भवितव्य मात्र अंधारात जाण्याची शक्यता आहे.
