नेमकं काय केले आरोप?
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बद्रुद्दीन म्हणाले, "ते शमीला दुर्लक्षित करत आहेत, हे स्पष्ट आहे. मला दुसरे कोणतेही कारण सुचत नाही." बद्रुद्दीन पुढे म्हणाले, "तो अनफिट नाही. जेव्हा एखादा खेळाडू कसोटी सामने खेळत असतो आणि दोन सामन्यांमध्ये 15 बळी घेतो तेव्हा तो अजिबात अनफिट दिसत नाही. निवडकर्ते फक्त त्याला दुर्लक्षित करत आहेत. फक्त तेच का ते स्पष्ट करू शकतात." बद्रुद्दीन म्हणाले की, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआय निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शमीला भारतीय संघातून वगळण्याचा निर्णय पूर्वनियोजित होता. 35 वर्षीय शमीची सुरुवातीला दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या अनधिकृत कसोटी किंवा एकदिवसीय सामन्यांसाठी भारत अ संघात निवड झाली नव्हती आणि नंतर त्याला वरिष्ठ संघातूनही वगळण्यात आले.
advertisement
'ते ठरवूनच, त्याला...' शमीबद्दल काय म्हणाले कोच?
तो म्हणाला, "मला वाटतं की त्यांनी आत्ताच त्याची निवड करणार नाही असं ठरवलं आहे आणि मला वाटतं की हे पूर्णपणे चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही कसोटी संघ निवडता तेव्हा तो रणजी ट्रॉफीमधील कामगिरीवर आधारित असावा. जर तुम्ही टी-20 च्या आधारावर कसोटीसाठी निवड करत असाल तर ते योग्य नाही. पण इथे असे दिसते की निर्णय आधीच ठरलेले असतात." गेल्या वेळी, मोहम्मद शमीला वगळण्याचे कारण फिटनेस असल्याचे सांगण्यात आले होते. शमी सध्या रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळत आहे, जिथे त्याने उत्तराखंडविरुद्ध 7 आणि गुजरातविरुद्ध 8 बळी घेतले. दोन सामन्यांमध्ये 15 बळी घेतल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत शमीचा समावेश होण्याची शक्यता वाटत होती, परंतु तसे झाले नाही.
