जय शाह अशी ऑफर देतील असं कधी स्वप्नातही विचार आला नव्हता असं गंभीर म्हणाला. एएनआय पॉडकास्टमध्ये बोलताना गंभीरने तो किस्सा सांगितला. ''आम्ही मुंबईत आयपीएलचा सामना खेळत होतो आणि सेंट रेजिस हॉटेलमध्ये थांबलो होतो. जय शाहांनी मला एकदम सकाळी सकाळी फोन केला आणि म्हणाले, 'मला तुला एक ऑफर द्यायची आहे आणि तू मला नकार देऊ शकत नाहीस.' मी विचारलं काय? तर ते म्हणाले, 'तुला टीम इंडियाचा हेड कोच व्हायचं आहे.' खरं सांगायचं तर, मी त्या क्षणी अजिबात तयार नव्हतो."
advertisement
गंभीरने प्रांजळपणे मान्य केलं की, त्याच्याकडे हेड कोच म्हणून काम करण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तो म्हणाला, "मला माहित होतं की मी कधीही कोणत्याही टीमचा हेड कोच राहिलो नव्हतो, फक्त मेंटॉर होतो. पण एवढी मोठी जबाबदारी आणि दडपण असलेल्या पदासाठी जय शाह यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल मी त्यांचा जितका आभार मानू तितका कमीच आहे."
जय शाह यांनी "तू नाही म्हणू शकत नाहीस" असं सांगितल्यावर गंभीरने आपल्या कुटुंबाशी आणि पत्नी नताशाशी चर्चा केली. भारतीय संघाची जर्सी पुन्हा एकदा घालण्याची आणि ड्रेसिंग रूममध्ये जाण्याची संधी खूप कमी माजी क्रिकेटपटूंना मिळते, हे ओळखून गंभीरने हे आव्हान स्वीकारलं.
जुलै २०२४ मध्ये राहुल द्रविडनंतर गंभीरने पदभार स्वीकारला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या असल्या, तरी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरगुती मालिकांमधील पराभव मात्र जिव्हारी लागणारे होते.
