इस्लामाबाद: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक सुनियोजित आयईडी (IED) स्फोट होता. हा स्फोट खैबर पख्तूनख्वा येथील बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलच्या कौसर क्रिकेट मैदानावर झाला.
advertisement
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये स्फोटानंतर लोक इकडे-तिकडे धावताना दिसत आहेत. तर मैदानात धुराचे मोठे लोट उठताना दिसत आहेत.
बाजौर जिल्ह्याचे पोलीस अधिकारी वकास रफीक यांनी या स्फोटाच्या घटनेला दुजोरा दिला आहे. डॉन डॉट कॉमशी बोलताना त्यांनी सांगितले की- हा हल्ला जाणीवपूर्वक केलेला असल्याचे दिसते. सूत्रांनुसार स्फोटात एक पोलीस कर्मचारी आणि नजीब खान नावाचा एक सामान्य नागरिक जखमी झाले.
स्फोटामुळे मैदानात उभी असलेली एक गाडीही खराब झाली. जखमींना तातडीने खार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस प्रवक्ते इसरार खान यांनी सांगितले की- हल्लेखोरांनी क्वाडकॉप्टरच्या मदतीने पोलीस ठाण्यावर आणखी एक हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला.
डॉनच्या अहवालानुसार, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की- हा हल्ला काही आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या दहशतवादविरोधी 'ऑपरेशन सरबकाफ'चा बदला असू शकतो. गेल्या महिन्यात 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या संघटनेने खैबर पख्तूनख्वा प्रांतातील सात जिल्ह्यांमध्ये पोलीस चौक्या, पोलीस ठाणी आणि गस्ती पथकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यांमध्ये सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.