श्रीलंकेचा फास्ट बॉलर असलेल्या इशान मलिंगा त्याच्या देशाकडून आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळला आहे. 4 फेब्रुवारी 2001 ला मलिंगाचा जन्म श्रीलंकेच्या रत्नपुरामध्ये झाला. किरीबाथगला कनकनामलागे इशान मलिंगा धर्मसेना असं त्याचं नाव आहे. रत्नपुराच्या सिवाली सेन्ट्रल कॉलेजमधून मलिंगाने क्रिकेट खेळायला सुरूवात केली.
शालेय क्रिकेटमध्ये मलिंगाने पहिल्यांदा त्याचं खेळातील कौशल्य दाखवलं. 2019 साली आंतरशालेय स्पर्धेतल्या सामन्यात मलिंगाने 63 रन देऊन 11 विकेट घेतल्या आणि तो प्रकाशझोतात आला. यानंतर त्याने 141 किमी प्रतीतासाच्या वेगाने बॉल टाकला आणि तो अंडर-19 क्रिकेटमधला श्रीलंकेतला सगळ्यात जलद बॉलर ठरला.
advertisement
मलिंगाने मे 2022 साली रागामा क्रिकेट क्लबकडून खेळताना स्थानिक टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्याचवर्षी जुलै महिन्यात मलिंगाने लिस्ट ए आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही पदार्पण केलं. मलिंगाने 16 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 28.74 च्या सरासरीने 39 विकेट घेतल्या. 33 रनवर 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर लिस्ट ए क्रिकेटच्या 17 सामन्यांमध्ये 27.50 च्या सरासरीने मलिंगाने 17 विकेट घेतल्या, ज्यात एका सामन्यात त्याने 5 विकेट घेतल्या. 16 टी-20 सामन्यांमध्ये 7.10 च्या इकोनॉमी रेटने मलिंगाने 17 विकेट घेतल्या आहेत.
स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या या कामगिरीबद्दल मलिंगाची श्रीलंकेच्या राष्ट्रीय टीममध्ये एण्ट्री झाली. जानेवारी 5, 2025 ला मलिंगाने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आयपीएल 2025 च्या लिलावात हैदराबादने इशान मलिंगाला 1.2 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.
इशान मलिंगा लसिथ मलिंगाचा नातेवाईक?
इशान मलिंगाचं आडनाव श्रीलंकेचा महान क्रिकेटर लसिथ मलिंगासारखंच असलं तरी तो लसिथ मलिंगाचा नातेवाईक नाही. याबाबत इशान मलिंगानेही अनेकदा स्पष्टपणे सांगितलं आहे.
