आयपीएलच्या 10 टीममध्ये मुंबई इंडियन्स सध्या तरी सर्वाधिक मजबूत टीम वाटत आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू फाफ डुप्लेसिसने आयपीएलच्या 19व्या मोसमाआधी मुंबईच्या ताकदीवर प्रकाश टाकला. मुंबईच्या टीममध्ये यंदा दोन आंद्रे रसेल आहेत, असं डुप्लेसिस म्हणाला आहे.
विल जॅक्सचा वर्ल्ड कपमध्ये धमाका
विल जॅक्सने नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये धमाका केला. फक्त बॅटिंगच नाही तर बॉलिंगमध्येही विल जॅक्सने उत्कृष्ट कामगिरी केली, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या बऱ्याच सामन्यांमध्ये जॅक्सला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. विल जॅक्सला मुंबईने आयपीएल 2025 च्या लिलावात टीममध्ये घेतलं होतं.
advertisement
रदरफोर्डचा तडाखा
आयपीएलच्या यंदाच्या लिलावाआधी मुंबई इंडियन्सने वेस्ट इंडिजचा विस्फोटक बॅटर शरफेन रदरफोर्डला गुजरातकडून ट्रेड केलं. 'रदरफोर्ड वेस्ट इंडिजसाठी आणि जगभरातील वेगवेगळ्या फ्रँचायझी लीगमध्ये सातत्याने रन करत आहे. मागच्या वर्षी टी-20 क्रिकेटमध्ये रदरफोर्डने सनसनाटी कामगिरी केली होती, तो प्रत्येक स्पर्धेत जोरदार फटकेबाजी करतो, असं फाफ डुप्लेसिस म्हणाला आहे.
'मुंबई इंडियन्सकडे विल जॅक्ससुद्धा आहे, जो इनिंगची सुरूवात करू शकतो आणि मॅच संपवू शकतो. तसंच तो विकेट घेणारा बॉलरही आहे. सध्या मुंबईच्या टीममध्ये दोन आंद्रे रसेल असल्यासारखं आहे. ही टीम चांगली दिसत आहे', असं वक्तव्य फाफ डुप्लेसिसने केलं.
फाफ डुप्लेसिसने विल जॅक्स आणि शरफेन रदरफोर्ड यांची तुलना टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील एका महान ऑलराऊंडरसोबत केली आहे. रसेल हा आयपीएलच्या मागच्या मोसमापर्यंत केकेआरचा भाग होता, पण यंदा मात्र केकेआरने रसेलला रिलीज केलं, त्यानंतर लगेचच त्याने निवृत्तीची घोषणा केली. आयपीएलच्या नव्या हंगामात रसेल केकेआरच्या कोचिंग स्टाफचा भाग आहे.
जगातली सगळ्यात मोठी टी-20 लीग असलेल्या आयपीएलमध्ये मुंबई सहावी ट्रॉफी जिंकण्यासाठी विल जॅक्स आणि शरफेन रदरफोर्ड यांच्या कामगिरीवर अवलंबून असेल.
