राजस्थान रॉयल्सकडून खेळत असलेल्या रवींद्र जडेजाने सामना संपल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्सचा फास्ट बॉलर खलील अहमदची भेट घेतली. या भेटीवेळी जडेजाने खलीलच्या जर्सीवर असलेल्या सीएसकेच्या लोगोचं चुंबन घेतलं. हा भावुक क्षण कॅमेरामध्येही कैद झाला.
जर्सी बदलली पण नातं तेच
जर्सी बदलली असली तरी चेन्नई सुपरकिंग्ससोबतचं आपलं नातं तसंच असल्याचं रवींद्र जडेजाने त्याच्या या कृतीतून दाखवून दिलं. जडेजा सीएसकेसोबत 12-13 वर्ष खेळला आणि टीमला अनेकदा ट्रॉफी जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 2018, 2021 आणि 2023 साली सीएसकेने आयपीएल ट्रॉफी जिंकली ज्यात जडेजा टीमचा महत्त्वाचा खेळाडू होता.
advertisement
सीएसकेची साथ सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता, सुरूवातीला मी खूपच भावुक झालो होतो, पण बदल हा क्रिकेट करिअरचा भाग आहे, त्यामुळे मी नंतर या गोष्टी सकारात्मक पद्धतीने स्वीकारल्या, अशी प्रतिक्रिया जडेजाने दिली.
मैदानात जडेजाला अश्रू
पहिली ओव्हर टाकल्यानंतर जडेजा बाऊंड्री लाईनवर फिल्डिंग गेला, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं, याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजस्थानकडून खेळत असताना पहिल्याच बॉलला जडेजाने विकेट घेतली. या सामन्यात जडेजाने सरफराज खान आणि शिवम दुबे या दोघांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
पुन्हा राजस्थानमध्ये आला जडेजा
रवींद्र जडेजाने त्याच्या आयपीएल करिअरची सुरूवात राजस्थान रॉयल्सकडून केली होती. 2008 साली आयपीएलच्या पहिल्याच मोसमात जडेजाने राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केलं आणि टीमने आयपीएलची पहिली ट्रॉफीही जिंकली. 'आता मला पिंक कलर चांगला दिसत आहे, यल्लो थोडा जुना वाटत होता. राजस्थानसोबत नवीन सुरूवात होत असल्यामुळे मी उत्साही आहे. माझ्या अनुभवाने मी युवा खेळाडूंची मदत करेन', असं जडेजा म्हणाला आहे.
