पाकिस्तानने ठेवल्या 2 अटी
पाकिस्तानमधल्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पीसीबीने युएईविरुद्धच्या मॅचआधी दोन अटी ठेवल्या. या अटी पूर्ण झाल्या तरच मॅच खेळू, अशी धमकी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली होती. यातली एक मागणी मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांना हटवून रिची रिचर्डसन यांची नियुक्ती करण्याची होती. तर दुसरी मागणी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची होती.
advertisement
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने क्रिकेट मॅचवेळी राजकीय वक्तव्य केलं, ज्यामुळे खेळ भावना दुखावली गेली आहे, तसंच सूर्यकुमार यादवचं वक्तव्य हे आचारसंहितेचा भंग आहे, असा आरोपही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला आहे.
...तर पाकिस्तानचं 140 कोटींचं नुकसान
पाकिस्तानच्या टीमने जर आशिया कपमधून माघार घेतली असती, तर त्यांचं 12 ते 16 मिलियन अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं असतं, म्हणजेच त्यांना जवळपास 130 ते 140 कोटी रुपये गमवावे लागले असते.
मॅच रेफरीवर पाकिस्तानचा आक्षेप
भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही. टॉसच्या आधी मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानी कर्णधार सलमान आघा याला हस्तांदोलन होणार नसल्याचं सांगितलं. मॅच रेफरीच्या या वर्तनावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज झालं. मॅच रेफरीने आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं असून त्यांनी एका टीमची बाजू घेतली, असा दावा पीसीबीने केला. तसंच युएईविरुद्धच्या सामन्यातून ऍन्डी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणीही पाकिस्तानने केली. आयसीसीने मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मागणी मान्य केली नाही.
ऍन्डी पायक्रॉफ्ट यांना हटवलं नाही तर युएईविरुद्धचा सामना खेळणार नाही, अशी धमकीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली होती. याचाच भाग म्हणून पाकिस्तानी खेळाडू युएईविरुद्धच्या सामन्यासाठी हॉटेलमधून बराच वेळ निघाले नव्हते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या बैठकीनंतर खेळाडू स्टेडियममध्ये जाण्यासाठी निघाले. दुबईमध्ये झालेल्या या राड्यामुळे सामना जवळपास एक तास उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.