15 सेकंदांची वेळ ओलांडली?
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानचा असा दावा आहे की, 50 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर अंपायरने वाईड दिल्यानंतर बांगलादेशने रिव्ह्यू घेण्यासाठी 15 सेकंदांची वेळ ओलांडली होती. मोठ्या स्क्रीनवर रिप्ले पाहिल्यानंतरच बांगलादेशने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. आयसीसीच्या नियमानुसार, 15 सेकंद संपण्यापूर्वीच कॅप्टनला रिव्ह्यूचा निर्णय घ्यावा लागतो, जो इथं पाळला गेला नाही, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. तसेच पाकिस्तानचा मुख्य आरोप असा आहे की बांगलादेशने बिग स्क्रीनवर रिप्ले पाहिल्यानंतर रिव्ह्यू घेतला. मात्र, पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये शाहीन काहीही बोलला नव्हता.
advertisement
पराभव जिव्हारी लागणारा असला तरी...
पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये शाहीन आफ्रिदी अंपायरच्या निर्णयावर काहीही बोलला नाही. शेवटच्या क्षणी मी प्रयत्न करणं माझं कामच होतं, पण रिशाद हुसेनने खरोखरच अप्रतिम बॉलिंग केली. तो एक उत्तम लेगस्पिनर आहे. बांगलादेशच्या टीमने आज खरोखरच चांगला खेळ केला आणि मी त्यांचे अभिनंदन करतो, असंही शाहीन शाह आफ्रिदी यावेळी म्हणाला. जरी हा पराभव जिव्हारी लागणारा असला तरी, यातून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आगामी सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षण, बॅटिंग आणि बॉलिंग या तिन्ही विभागांत अधिक सुधारणा करण्यावर टीमचा भर असेल, असंही शाहीन आफ्रिदी मॅच संपल्यावर म्हणाला होता.
आयसीसीचा नियम काय सांगतो?
बॉल 'डेड' झाल्यापासून केवळ 15 सेकंदांच्या आत खेळाडूला रिव्ह्यूची मागणी करावी लागते. या वेळेनंतर केलेली कोणतीही विनंती अंपायर स्वीकारू शकत नाहीत. 10 सेकंद उलटूनही जर खेळाडूने निर्णय घेतला नसेल, तर बॉलरच्या बाजूचे अंपायर खेळाडूला याची आठवण करून देतात. या सूचनेनंतर खेळाडूला त्वरित आपला निर्णय कळवावा लागतो. जर ऑन-फील्ड अंपायरना असे वाटले की खेळाडूने 15 सेकंदांची वेळ संपल्यानंतर रिव्ह्यू मागितला आहे, तर ते सरळपणे 'प्लेअर रिव्ह्यू'ची विनंती फेटाळून लावू शकतात.
सलमान अली आगाचं तोंडभरून कौतुक
दरम्यान, शाहीनने यावेळी सलमान अली आगा याचं कौतुक देखील केलं होतं. सलमान हा टेस्ट आणि वनडे फॉरमॅटमधील एक दर्जेदार खेळाडू आहे. मिडल ऑर्डरमध्ये तो नेहमीच चांगली कामगिरी करतो. स्पिन आणि फास्ट बॉलिंग या दोन्हीवर त्याचे उत्तम नियंत्रण आहे. त्याने पाकिस्तानसाठी खेळलेली ही खेळी प्रदीर्घ काळ लक्षात राहील, असं शाहीन शाह आफ्रिदी म्हणाला.
