रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर रिवाबा जडेजाचं अभिनंदन करणारी पोस्ट लिहिली आहे. 'मला तुझा आणि तुझ्या कामगिरीचा खूप अभिमान आहे. तू तुझ्या चांगल्या कामाने लोकांना प्रेरणा देत राहशील, हे मला माहिती आहे. गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून तुला शुभेच्छा', अशी पोस्ट रवींद्र जडेजाने केली आहे.
गुजरात सरकारने आपल्या मंत्रिमंडळात 25 नवीन मंत्र्यांचा समावेश केला आहे, ज्यात रिवाबा जडेजाचा समावेश आहे. 34 वर्षीय रिवाबा जडेजा 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात सामील झाल्या. 2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत रिवाबा जामनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आली. 2016 मध्ये तिने भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाशी लग्न केले आणि त्यांना निध्याना जडेजा नावाची एक मुलगी आहे.
जडेजाची दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी तयारी
दुसरीकडे भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे 19 ऑक्टोबरपासून 3 वनडे मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे. या सीरिजसाठी जडेजाची भारतीय टीममध्ये निवड झालेली नाही, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये जडेजा कमबॅक करू शकतो. जडेजाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेची टीम नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 टेस्ट मॅच, 3 वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे.