चिन्नास्वामी स्टेडियमवरही मॅच खेळायला परवानगी न मिळाल्यामुळे आता कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे हे दोन्ही सामने होणार आहेत. सीओई परिसरामध्ये एकूण 3 मैदाने आहेत.
सोमवारी बंगळुरू शहर पोलीस आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीने चिन्नास्वामी स्टेडियमची पाहणी केली आणि पॅनेलचे प्रमुख असलेले ग्रेटर बंगळुरू प्राधिकरण (जीबीए) आयुक्त महेश्वर राव यांना आपला अहवाल सादर केला. 'समितीने स्टेडियमची पाहणी केली आणि असा निष्कर्ष काढला की सामने आयोजित करण्यासाठी योग्य सुविधा नाहीत. आवश्यक काम पूर्ण झाल्यानंतरच सामने आयोजित करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला जाईल. सध्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने आयोजित करण्याची केएससीएची परवानगी नाकारण्यात आली आहे', असं शहर पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंग म्हणाले.
advertisement
बैठकीदरम्यान, केएससीए अधिकारी आणि पॅनेलने न्यायमूर्ती जॉन मायकेल कुन्हा कमिशनच्या अहवालाच्या अंमलबजावणीवरही चर्चा केली, ज्यामध्ये 17 शिफारशींचा उल्लेख करण्यात आला होता. 24 डिसेंबरच्या सामन्यापूर्वीच्या सुरक्षेच्या चिंतेमुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं झालं, शहर पोलिसांना सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये ख्रिसमस उत्सव व्यवस्थापित करण्याची जबाबदारी देखील देण्यात आली.
सेंटर ऑफ एक्सलन्स येथे अनुक्रमे ग्राउंड दोन आणि एकवर सामने आयोजित केले जातील. 4 जूनला आरसीबीच्या विजयी सोहळ्यादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली, यात 11 जणांचा मृत्यू झाला तर बरेच जण जखमी झाले, त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव चिन्नास्वामी स्टेडियमवरचे पुढचे सगळे सामने स्थगित करण्यात आले. विजय हजारे ट्रॉफीनिमित्त विराट बंगळुरूमध्ये खेळणार आहे, त्यामुळे केएससीएने चिन्नास्वामी स्टेडिमवर सामने खेळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला परवानगी मिळाली नाही.
प्रेक्षकांशिवाय सामना
सीओईमध्ये प्रेक्षकांना बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे विराट कोहली जे दोन सामने खेळणार आहे, ते बंद दाराआड खेळवले जातील. विराटची बॅटिंग बघता येणार नसल्यामुळे चाहत्यांची मात्र निराशा झाली आहे. विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी मंगळवारी दिल्लीसाठी नेट प्रॅक्टिस केली. दोघांनीही त्यांचे दिल्लीच्या टीममधील सहकारी इशांत शर्मा आणि नवदीप सैनी यांच्यासोबत एक तास सराव केला.
