पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर अशोक डिंडा याला तिकीट दिलं आहे. अशोक डिंडा मोयना विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर रिंगणात उतरणार आहे. याआधी 2021 साली या जागेवरून अशोक डिंडा विजयी झाला होता. आता लागोपाठ दुसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी डिंडा निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.
2009 मध्ये पदार्पण
अशोक डिंडा याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण 2009 साली एमएस धोनीच्या नेतृत्वात झालं. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये श्रीलंकेविरुद्ध डिंडाला खेळण्याची संधी मिळाली, यानंतर पुढच्याच वर्षी डिंडाने वनडे क्रिकेटमध्येही पदार्पण केलं, पण त्याला भारताकडून टेस्ट क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. 2013 साली डिंडा टीम इंडियाकडून शेवटचा सामना खेळला. इंग्लंडविरुद्धच्या या वनडे मॅचनंतर डिंडाला पुन्हा कधीच संधी मिळाली नाही.
advertisement
सोशल मीडियावर डिंडा ट्रोल
अशोक डिंडावर सोशल मीडियावर बरेच मीम बनतात. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये महागड्या ओव्हर टाकल्यामुळे डिंडाला कायमच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावर अजूनही डिंडा अकॅडमी नावाने मीम व्हायरल केले जातात. जेव्हा एखादा बॉलर जास्त रन देतो, तेव्हा त्याचा उल्लेख डिंडा अकॅडमीचा विद्यार्थी म्हणून केला जातो.
डिंडाचं करिअर
अशोक डिंडाचं आंतरराष्ट्रीय करिअर फक्त 4 वर्ष चाललं, या दरम्यान त्याने 13 वनडे मॅच खेळल्या, आणि 6.18 च्या इकोनॉमी रेटने 12 विकेट घेतल्या. 44 रन देऊन 2 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. तर 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 17 विकेट घेतल्या, पण त्याचा इकोनॉमी रेट 8 पेक्षा जास्त होता. टी-20 मध्ये डिंडाची सर्वोत्तम कामगिरी 19 रनवर 4 विकेट आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मात्र डिंडाची कामगिरी उत्कृष्ट आहे. 116 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये डिंडाने 420 विकेट घेतल्या. तर लिस्ट-ए च्या 98 सामन्यांमध्ये त्याला 151 विकेट मिळाल्या आहेत. 78 आयपीएल सामन्यांमध्ये डिंडाने 69 विकेट मिळवल्या.
