कुस्तीच्या वारशावर दारिद्राची गडद छाया
सिकंदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मधला रहिवासी आहेत. गंगावेश तालमीच्या पठ्ठ्याने अखेर महाराष्ट्र केसरीवर नाव कोरत जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला आहे. सिकंदर शेख म्हणजे कुस्तीचं जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा... घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा होता पण या वारशावर दारिद्राची गडद छाया कायम होती. त्यामुळे घरात वडील रशिद शेख हमाली करायचे. तसेच ते पैलवानकी देखील करत होते.
advertisement
वस्ताद चंदु काळेंचे मार्गदर्शन
राशिद शेख यांनी दोन मुलांच्या जन्मानंतर त्यांनी हमाली सुरू केली होती. आपल्या लहानग्या मुलांना घेऊन आखाड्यात जाऊ लागले. मुलांना कुस्तीचे धडे देऊ लागले. सोबतीला वस्ताद चंदु काळेंचे मार्गदर्शन मिळत होतं.
भावाने हमालीचं काम खांद्यावर घेतलं
वडील आजारी पडल्यानंतर सिकंदरच्या खुराकाला पैशांची चणचण जाणवू लागली होती. त्यावेळी त्याच्या मोठ्या भावाने वडिलांचं हमालीचं काम खांद्यावर घेतलं अन् भावाला कुस्तीसाठी काहीही कमी पडून दिलं नाही. सिकंदर हळूहळू कुस्तीचे डावपेच शिकू लागला अन् बारक्या कुस्त्याच नाही तर महाराष्ट्रातील मोठ्या कुस्त्या सिकंदरने जिंकल्या.
महाराष्ट्र केसरी मानाची गदा पटकावली
आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर कमी वयात सिंकदर आता महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कुस्ती पटावर चमकला. महाराष्ट्र केसरीच्या 66 व्या स्पर्धेमध्ये सिकंदर शेख याने विजय मिळवत मानाची गदा पटकावली होती. पुण्यातील फुलगाव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये फायनल सामन्यात सिकंदरने शिवराज राक्षे याला चीतपट केलं होतं. त्यावेळी काहीसा वाद देखील झाला होता.
बक्षिसांची लयलूट
दरम्यान, महाराष्ट्र केसरी जिंकल्यावर सिंकदरने मागे वळून पाहिलं नाही. सिंकदरने बक्षिसांची लयलूट केली आहे. यामध्ये एक महिन्द्रा थार चारचाकी, एक जॉन डिअर ट्रक्टर, चार अल्टो कार, चोवीस बुलेट, सहा टिव्हीस, सहा सप्लेंडर तर तब्बल चाळीस चांदी गदा त्याने आपल्या नावावर केल्या आहेत.
