महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये भारत सेमीफायनला पोहोचण्याची वाट आता रनरेटवर अवलंबून आहे. भारतीय महिला संघ टी२० वर्ल्ड कपमध्ये ग्रुप ए मध्ये आहे. या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेचा संघ आहे. श्रीलंका वगळता इतर संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. यामुळे भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. या ग्रुपमधील टॉपचे दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.
advertisement
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलने आतापर्यंत प्रत्येकी एकच सामना खेळला आहे. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेचे प्रत्येकी दोन सामने झाले आहेत. यात एक विजय आणि एक पराभव झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड भक्कम स्थितीत आहेत. त्यापैकी एक संघ ८ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. तर इतर संघ जास्ती जास्त ६ पॉइंट मिळवू शकतात.
भारतीय संघाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभूत व्हावं लागलं. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला भारताने नमवलं. भारताला ६ गुण मिळवायचे असतील तर उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. भारताला आता ९ ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध, १३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचं आहे. यात एका सामन्यात जरी पराभव झाला तरी भारतीय संघाला जर-तर च्या समीकरणावर अवलंबून रहावं लागेल.
भारतीय संघाने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला हरवलं तर ६ गुण होतील. मात्र न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियाचे ६ पेक्षा जास्त गुण होण्याची शक्यताही आहे. अशा स्थितीत नेट रनरेटवर निर्णय होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना झाला. पाकिस्तानने भारतासमोर १०६ धावांच आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान १८.५ षटकात ५ विकेटच्या बदल्यात पूर्ण केलं. या विजयामुळे भारताला २ गुण मिळाले पण नेट रनरेट जास्त बदलला नाही. भारताने जर पाकिस्तानला ११ ते १२ षटकात हरवलं असतं तर रनरेट वाढला असता.