अदिती कुडवा यांना व्यवसाय करण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरीदेखील त्यांनी कपडे विक्रीच्या व्यवसायात पाऊल ठेवलं. सुरुवातीला साड्या, ड्रेस मटेरीअल्स आणि वेस्टर्न कपडे घरोघरी जाऊन विकायला सुरुवात केली. ज्येष्ठ महिलांपासून ते कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी उपयुक्त कपडे त्या घेऊन फिरत. ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांनी सुधारणा केल्याने लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसत गेला. या अनुभवातून आत्मविश्वास मिळाल्यानंतर त्यांनी लोकलमध्ये कपडे विकण्याचा धाडसी निर्णय घेतला.
advertisement
विरार ते दादर या मार्गावर अदिती यांनी कपड्यांची विक्री सुरू केली. लोकल ट्रेनमधील गर्दी आणि प्रवाशांची धावपळ यावर मात करत त्यांनी आपला व्यवसाय वाढवत नेला. फक्त वस्तू विकण्यावर भर न देता ग्राहकांशी वैयक्तिक नातं तयार करून त्यांनी प्रत्येकाच्या गरजा समजून घेतल्या. काही वर्षांत त्यांनी 'अदिती कलेक्शन' नावाने दादरमध्ये पहिलं दुकान सुरू केलं. त्यानंतर 'स्वामिनी कॉटन हब' हे दुसरं दुकान उघडलं. दोन्ही ठिकाणी पारंपरिक आणि आधुनिक कपड्यांची उत्तम व्हरायटी ग्राहकांना मिळू लागली.
दोन्ही दुकानांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी 'माहेर' नावाने तिसरं दुकान सुरू केलं. या दुकानात साड्यांबरोबरच ज्वेलरी, ब्लाउज आणि अॅक्सेसरीजही मिळतात. आपला अनुभव सांगताना अदिती म्हणाल्या, "परिस्थिती कशीही असो जर ध्येय स्पष्ट असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. व्यवसायाच्या मार्गात अडचणी असतात. पण, त्या झेलून पुढे जात राहिलं तर यश हमखास मिळतं." आज त्यांच्या मालकीची तीन दुकानं आहेत. विश्वासू स्टाफ आणि हजारो समाधानी ग्राहक हे त्यांच्या कामाची पोचपावती आहेत.