वरवर पाहता हे दोन्ही पर्याय सारखेच वाटतात. आपल्याला वाटतं की कॉम्प्युटर बंदच करायचा आहे, मग कोणताही बटन दाबलं तरी काय फरक पडतो? पण थांबा. तंत्रज्ञानाच्या भाषेत या दोन पर्यायांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. चुकीच्या वेळी चुकीचा पर्याय निवडल्याने तुमच्या कॉम्प्युटरचा वेग कमी होऊ शकतो. चला तर मग, या दोन्ही पर्यायांमागचं नेमकं गणित काय आहे, ते सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
'शटडाउन' केल्यावर नक्की काय होतं?
विंडोज 8,10 आणि 11 वापरणाऱ्यांना कदाचित हे माहित नसेल की, जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर 'शटडाउन' करता, तेव्हा तो पूर्णपणे बंद होत नाही. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे.
नवीन विंडोजमध्ये 'फास्ट स्टार्टअप' (Fast Startup) नावाचं एक फिचर असतं. जेव्हा तुम्ही शटडाउन दाबता, तेव्हा विंडोज तुमचे सर्व ओपन प्रोग्राम्स आणि फाइल्स बंद करते, पण ऑपरेटिंग सिस्टमचा मुख्य भाग असलेला 'विंडोज कर्नेल' (Windows Kernel) पूर्णपणे बंद न होता डिस्कवर सेव्ह होतो. यामुळे काय होतं? तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लॅपटॉप सुरू करता, तेव्हा तो अगदी काही सेकंदात 'बूट' होतो. म्हणजे शटडाउन हा प्रकार कॉम्प्युटरला पूर्ण विश्रांती देण्याऐवजी त्याला 'गाढ झोपेतून' लवकर उठवण्यासाठी तयार करतो.
मग 'रिस्टार्ट' म्हणजे काय?
दुसरीकडे, जेव्हा तुम्ही 'रिस्टार्ट' हा पर्याय निवडता, तेव्हा कॉम्प्युटर विंडोज कर्नेलसह सर्व बॅकग्राउंड प्रोसेसेस पूर्णपणे बंद करतो. रिस्टार्ट केल्यावर रॅम (RAM) पूर्णपणे रिकामी होते आणि कॉम्प्युटर पुन्हा शून्यापासून सुरू होतो. यामुळे कॉम्प्युटर सुरू व्हायला शटडाउनच्या तुलनेत थोडा जास्त वेळ लागतो, पण तुम्हाला एक 'क्लीन स्टार्ट' मिळते.
जर तुमचा कॉम्प्युटर गेल्या अनेक दिवसांपासून नीट चालत नसेल, तर त्याला फक्त 'शटडाउन' करू नका. दिवसातून किंवा किमान दोन दिवसातून एकदा कॉम्प्युटर 'रिस्टार्ट' करण्याची सवय लावा. यामुळे कॉम्प्युटरमधील तांत्रिक कचरा साफ होतो आणि लॅपटॉपचा परफॉर्मन्स सुधारतो.
आता पुढच्या वेळी कॉम्प्युटर बंद करताना तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडा आणि आपल्या मशीनचं आयुष्य वाढवा.
