गेल्या वर्षी बीएसएनएलने नवीन लोगो आणि स्लोगन लाँच केलं. तसेच या सरकारी कंपनीने सात नवीन सुविधा देखील लाँच केल्या. यात स्पॅम फ्री नेटवर्क, एटीएस किऑस्क आणि D2D सुविधेचा समावेश आहे. भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने D2D म्हणजेच डायरेक्ट टू डिव्हाईस ही सुविधा सध्या प्रायोगिक तत्त्वावर लाँच केली आहे. यात युजर्स सिम कार्ड आणि मोबाईल नेटवर्कशिवाय कॉल करू शकणार आहेत.
advertisement
बीएसएनएलप्रमाणे जिओ, एअरटेल, व्हीआयदेखील या सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी सर्व्हिसवर काम करत आहेत. तसेच एलॉन मस्क यांची स्टारलिंक आणि ॲमेझॉनने देखील भारतात या उपग्रह सेवेसाठी अर्ज केला आहे. पण या दोन्ही कंपन्यांना दूरसंचार विभाग अर्थात डीओटीकडून मंजुरी मिळालेली नाही.
सध्या सरकार सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीसाठी स्पेक्ट्रम वाटपाच्या प्रक्रियेची तयारी करत आहे. दूरसंचार विभागाने इंडस्ट्रीशी निगडीत भागधारकांकडून याची किंमत आणि वाटपाबाबत सूचना मागवल्या आहेत. प्रतिसाद मिळाल्यानंतर स्पेक्ट्रम वाटपाची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर बीएसएनएल, एअरटेल, जिओसह इतर कंपन्या स्वतःची उपग्रह सेवा सुरू करू शकतील. यामुळे लोकांना मोठा फायदा होईल असं बोललं जात आहे.
बीएसएनएलने प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली D2D सेवा खूप खास आहे. ही सेवा उपग्रहाच्या माध्यमातून स्मार्टफोन, स्मार्टवॉचसह इतर गॅजेट्सना कनेक्ट होते. यात कोणत्याही प्रकारच्या टेरेस्टियल मोबाईल नेटवर्कची गरज पडत नाही. बीएसएनएलने D2D सुविधेसाठी व्हायासॅटशी करार केला आहे. काही दिवसांपूर्वी या सेवेची चाचणी पूर्ण झाली. देशातील सामान्य युजर्सही या सेवेच्या माध्यमातून विना सिम कार्ड थेट मोबाईल डिव्हाईसवरून ऑडिओ, व्हिडिओ कॉल करू शकणार आहेत.