नम लॉक कीद्वारे दोन मोड अॅक्टिव्ह केले जातात. न्यूमरिक आणि नेव्हिगेशन असे हे दोन मोड्स आहेत. या दोन्ही मोडमध्ये नेमकं काय होतं आणि कीबोर्डवर त्यांचा कसा वापर होतो, याची माहिती घेऊ या.
न्यूमरिक मोड : नम लॉक की ऑन असताना कीबोर्डमधलं न्यूमरिक कीपॅड 0 ते 9 हे अंक आणि अंकगणितातली मूलभूत चिन्हं (+, -, *, /), तसंच संख्यांचा संच म्हणून काम करतो. न्यूमरिकल डेटा भरताना किंवा आकडेमोड करताना न्यूमरिक मोड आवश्यक असतो.
advertisement
नेव्हिगेशन मोड : जेव्हा नम लॉक की ऑफ केली जाते तेव्हा न्यूमरिक की पॅड नेव्हिगेशन कीज म्हणून कार्य करतं. अशा वेळी 8, 4, 2, 6 हे क्रमांक असलेल्या कीज अॅरो म्हणून कार्य करतात. यांच्या मदतीने स्क्रीनवरचा कर्सर वर-खाली आणि डावीकडे-उजवीकडे नेण्याच्या कमांड देता येतात. 3, 9, 7 आणि 1 हे क्रमांक असलेल्या कीजच्या माध्यमातून होम, पेज अप, एंड आणि पेज डाउन या कमांड देता येतात. या मोडद्वारे डॉक्युमेंट्स किंवा स्प्रेडशीटमध्ये नेव्हिगेट करणं सोपं होतं.
सामान्यतः न्यूमरिक कीपॅडवर नम लॉक की आढळते. हा कीबोर्डच्या उजव्या बाजूला असलेला कीजचा एक वेगळा संच असतो. नम लॉक की ऑन करताच कीबोर्डवर दिलेल्या तीन एलईडी लाइट्सपैकी एक लाइट पेटतो. याउलट जेव्हा नम लॉक की ऑफ होते तेव्हा हा लाइट बंद होतो. कधी-कधी नम लॉक की वेगवेगळ्या प्रणाली आणि कीबोर्डमध्ये वेगळ्या पद्धतीने कार्य करते, ही बाबदेखील लक्षात ठेवली पाहिजे.
अनेक जण आजकाल लॅपटॉपच्या कीबोर्डचा वापर न करता त्याला स्वतंत्र कीबोर्ड जोडतात. कारण, मोठा कीबोर्ड हाताळणं आणि त्यावर टायपिंग करणं सोपं जातं.
