मावळ तालुका हा महाराष्ट्रातील एक प्रमुख फुलउत्पादन केंद्र म्हणून ओळखला जातो. आधुनिक शेती पद्धती, विशेषतः पॉलीहाऊस तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी गुलाब उत्पादनात लक्षणीय वाढ पाहिली मिळत आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यापासून चांगली थंडी पडल्यामुळे गुलाबांच्या उत्पादनावर सकारात्मक परिणाम झाला आहे. थंड हवामानामुळे फुलांचा रंग गडद, देठ मजबूत आणि कळीची गुणवत्ता उत्तम मिळाली आहे. परिणामी बाजारात या गुलाबांना चांगला दर मिळत असून, एका फुलासाठी किमान 20 ते 25 रुपये दर मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.
advertisement
Success Story : पारंपरिक पिकांना फाटा, तरुणाने केली फळाची शेती, कमाईही दमदार Video
हॉलंड, ब्रिटन, दुबई, सिंगापूर, जपान यासह गल्फ देश, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधून मावळातील गुलाबांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. फुल उत्पादक शेतकरी दिलीप काळे यांच्या मते, यंदा उत्पादनाची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याने परदेशी खरेदीदारांकडून ऑर्डर्स वाढल्या आहेत. सुमारे 60 ते 70 लाख गुलाब परदेशात पाठवले जाणार आहेत.
निर्यात प्रक्रिया कशी असते?
गुलाब काढणीनंतर लगेच फुलांचे ग्रेडिंग केले जाते. कळीचा आकार, देठाची लांबी, रंग आणि ताजेपणा यानुसार गुलाबांचे वर्गीकरण होते. त्यानंतर फुलांना थंड पाण्यात प्री-कूलिंग करून तापमान कमी केले जाते, जेणेकरून ताजेपणा टिकून राहील. यानंतर गुलाबांना खास व्हेंटिलेशन असलेल्या कार्टन बॉक्समध्ये पॅक केले जाते. हे बॉक्स कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून विमानतळावर पाठवले जातात. एअर कार्गोच्या माध्यमातून 24 ते 48 तासांत गुलाब परदेशातील बाजारपेठेत पोहोचतात. संपूर्ण प्रक्रियेत तापमान 2 ते 5 अंश सेल्सिअस दरम्यान असते जे निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते.
गुलाबांची शेल्फ लाईफ किती?
योग्य काढणी, थंड साखळी (कोल्ड चेन) आणि योग्य पॅकिंग केल्यास गुलाबांची शेल्फ लाईफ साधारण 10 ते 15 दिवसांपर्यंत असते. काही उच्च दर्जाच्या गुलाबांची शेल्फ लाईफ 20 दिवसांपर्यंतही टिकू शकते. त्यामुळे परदेशातील बाजारात पोहोचल्यानंतरही हे गुलाब ताजे आणि आकर्षक दिसतात.
व्हॅलेंटाइन डे निमित्त वाढलेल्या मागणीमुळे मावळातील गुलाब केवळ प्रेमाचे प्रतीक न राहता, शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलास्याचे आणि ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीचे प्रभावी माध्यम ठरत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, नियोजनबद्ध निर्यात आणि दर्जेदार उत्पादन यांच्या जोरावर मावळातील गुलाब आता जागतिक बाजारात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत.





