बैलगाडा शर्यतीच्या जुन्या वादातून घडलं विपरीत
वसंत धनावडे हे नेहमीप्रमाणे दूधडेरी परिसरात दूध देण्यासाठी जात असताना नितीन दत्ताराम धनावडे याने त्यांचा रस्ता अडवला. जुन्या बैलगाडा शर्यतीच्या वादातून नितीनने वसंत धनावडे यांना दगडाने मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात वसंत धनावडे गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत त्यांचा मुलगा योगेश धनावडे यांनी त्यांना तत्काळ महाड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र जखम गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. माणगाव येथील डॉक्टरांनी डोळ्याला दगड लागून डोळा निकामी झाल्याचे सांगत अधिक उपचारांसाठी मुंबईला पाठवले.
advertisement
अद्याप कोणताही गुन्हा दाखल नसल्याने संताप
सध्या वसंत धनावडे हे मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेची माहिती योगेश धनावडे यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
पोलिसांनी तात्काळ आरोपीवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी योगेश धनावडे यांनी केली आहे. उपचारादरम्यान वडिलांच्या जीवाला काही धोका झाल्यास त्याला पोलीस प्रशासन व आरोपी नितीन धनावडे जबाबदार असतील, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे
