सहा महिन्यांनंतर धावणार अलिबाग-रोहा बस
अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात अलिबाग-रोहा मार्गावरील नवघर येथील एक आणि सुडकोली येथील दोन असे एकूण तीन पूल धोकादायक असल्याचे आढळून आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या मार्गावरून पाच टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरील एसटी बससेवा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
advertisement
बससेवा बंद असल्यामुळे अलिबाग ते रोहा थेट प्रवास शक्य नसल्याने केवळ अलिबाग ते महानपर्यंतच बससेवा सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे पुढील प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला.
अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक पुलांच्या बाजूने तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्गाची व्यवस्था करून दिली आहे. या पर्यायी मार्गामुळे बससेवा सुरू करण्यात आता कोणतीही अडचण राहिलेली नाही. याबाबत अलिबाग आणि रोहा येथील आगार व्यवस्थापकांना पत्र पाठवून बससेवा सुरू करण्यास हरकत नसल्याचे कळविण्यात आले आहे.
या निर्णयानुसार मंगळवार 23 डिसेंबरपासून अलिबाग-रोहा बससेवा सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून त्रस्त असलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे
