मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान पटेल असे या नराधम आरोपीचं नाव आहे. त्याने आपल्या स्कूल व्हॅनमध्ये या चिमुरडीचा छळ केला. ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. आरोपीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची गुन्ह्याची भीषणता लक्षात घेऊन २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
advertisement
आरटीओचा मोठा खुलासा: विनापरवाना सुरू होती व्हॅन
या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी इम्रान पटेलकडे स्कूल व्हॅन चालवण्याचा कोणताही अधिकृत आरटीओ परवाना नव्हता. नियमांची पायमल्ली करून तो अवैधपणे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करत होता. या गंभीर निष्काळजीपणाबद्दल आरटीओ विभागाने आरोपीला २४ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, गुन्ह्यात वापरलेली स्कूल व्हॅन पोलिसांनी जप्त केली आहे.
शालेय सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
बदलापुरातील या घटनेनं शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी देखील बदलापूरमध्ये अशीच घटना घडली होती. शाळेतील एका कर्मचाऱ्याने चिमुकल्या मुलींवर अत्याचार केला होता. या घटनेचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले होते. संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलन करून संपूर्ण रेल्वे मार्ग अडवला होता. मुंबईतील रेल्वे सेवा बंद पाडली होती. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना हटवलं होतं. या घटनेच्या आठवणी ताज्या असताना बदलापुरात घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
