ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी 7 दिवसांच्या नवजात बालकाची 6 लाख रूपयांना विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. शुक्रवारी पोलिसांनी या कारवाईची माहिती माध्यमांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला (AHTC) या संदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी त्याप्रमाणे, बुधवारी रात्री बदलापूर पश्चिम परिसरातील एका हॉटेलजवळ सापळा रचला. पोलिसांनी एका बनावट ग्राहकाद्वारे या टोळीशी संपर्क साधला आणि व्यवहाराची खात्री केली. या टोळीने बाळासाठी 6 लाख रूपयांची मागणी केली होती. त्यापैकी 20 हजार रूपये टोकन म्हणून यूपीआय (UPI) द्वारे पैसे स्वीकारले होते, तर उर्वरित 5 लाख 80 हजार रूपये रोख स्वरूपात घेण्याचे ठरले होते.
advertisement
बनावट ग्राहकाच्या सूचनेनुसार, पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले आणि व्यवहारासाठी आलेल्या पाचही जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये रोकड स्वीकारणारा शंकर संभाजी मनोहर (वय 36), बाळ मिळालेली रेश्मा शेख (वय 35), एजंट नितीन मनोहर (वय 33), शेखर जाधव (वय 35) आणि आसिफ खान (वय 27) यांचा समावेश आहे. यामध्ये बाळाची आई कोण आहे आणि हे बाळ कोठून आणले, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. दरम्यान, सहावा साथीदार, जिची ओळख सबिना म्हणून झाली आहे, ती फरार असून पोलिस तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी पोलिसांनी माहिती दिली. अपत्यहीन जोडप्यांना अशा प्रकारे बाळ विकण्याचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस उपायुक्तांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात काही रुग्णालये किंवा नर्सिंग होम्सचा सहभाग आहे का, याचाही सखोल तपास सुरू आहे.
बदलापूर (पश्चिम) पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, "या टोळीने नवजात बाळाला 6 लाख रुपयांना विकण्याचा कट रचला होता. आम्हाला संशय आहे की हे एक मोठे रॅकेट असून, यामध्ये बालकांचे अपहरण करून त्यांची विक्री केली जाते. या बाळाला सध्या सरकारी निगा केंद्रात ठेवण्यात आले आहे. आम्ही त्या बाळाच्या आई- वडिलांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत." फरार असलेल्या सबिना नावाच्या महिलेच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे. टोळीने बाळाची विक्री करण्यासाठी एका हॉटेलबाहेर व्यवहार केला होता. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात हे आरोपी अलगद अडकले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एजंट्सचा समावेश आहे. या टोळीने यापूर्वीही अशा प्रकारे बालकांची विक्री केली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
बाळाला एका विशेष काळजी गृहात हलवण्यात आले आहे. नवजात बालकांची तस्करी करणार्यांना पुरवण्यात रुग्णालये किंवा नर्सिंग होमचे विस्तृत नेटवर्क सामील आहे का याचाही पोलिस तपास करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
