समाजमाध्यमांवरील अफवेचे बळी
सहकारनगर येथील ऑटो स्टँड परिसरात चार महिला संशयास्पदरीत्या फिरताना दिसल्याने नागरिकांना संशय आला. मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा काही वेळातच संपूर्ण परिसरात पसरली. त्यानंतर मोठा जमाव एकत्र जमला आणि कोणतीही चौकशी न करता महिलांना घेरून मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संतप्त जमावाला शांत करून पोलिसांनी चारही महिलांना सुरक्षितरित्या ताब्यात घेतले आणि रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिला यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून त्या नायगाव पूर्व येथील जुचंद्र स्टेशन परिसरातील झोपडपट्टीत राहतात.
advertisement
झाडांवरील मध गोळा करण्यासाठी आल्या; अफवेमुळे महिलांना मारहाण
या महिला वसई-विरार परिसरात झाडांवरील मध गोळा करण्यासाठी आल्या होत्या. त्यांचा मुलांच्या अपहरणाशी कोणताही संबंध नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र समाजमाध्यमांवर पसरलेल्या अफवांमुळे त्या महिलांना लक्ष्य करण्यात आले.
या प्रकरणी नागरिकांचे जबाब नोंदविण्यात आले असून सध्या कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अफवा कशी पसरली याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे.
