तक्रारदार महिला मूळची झारखंड येथील रहिवासी असून गेल्या चार महिन्यांपासून ती मुंब्रा-कौसा परिसरात आपल्या वडिलांकडे राहत आहे. तिला दोन मुली असून त्यातील एक मुलगी तीन वर्षांची तर दुसरी अवघी तीन महिन्यांची आहे.
नेमके त्या वेळी काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता ओलांडताना मदत करण्याच्या बहाण्याने एका बुरखाधारी अनोळखी महिलेने चिमुकलीला कडेवर घेतले आणि काही क्षणांतच ती पसार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
चिमुकलीला कडेवर घेतले अन् काही क्षणांतच
गुरुवारी दुपारी ती आपल्या दोन्ही मुलींना घेऊन मुंब्यातील तन्वर नगर येथे बहिणीकडे गेली होती. सायंकाळच्या सुमारास ती वडिलांच्या घरी परतत असताना साहील हॉटेलजवळील डीसीबी बँकेसमोर रस्ता ओलांडत होती. त्या वेळी तिच्या कडेवर तीन वर्षांची मुलगी होती, तर तीन महिन्यांची चिमुकली हातात होती.
याच वेळी बुरखा परिधान केलेली एक अनोळखी महिला तिथे आली. तिने 'लहान बाळ मला द्या, मीही समोरच चालले आहे' असे सांगून मदतीचा बहाणा केला. विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने चिमुकली तिच्याकडे दिली. ती महिला काही अंतरापर्यंत सोबत होती. मात्र रस्ता ओलांडल्यानंतर ती अचानक चिमुकलीसह गायब झाली.
अपहरण करणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून शोध
घटनेनंतर तक्रारदार महिलेने आरडाओरड केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
