मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्व भागातील कॅनरा बँकेत मंगळवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. एका माथेफिरू व्यक्तीने अचानक बँकेत प्रवेश केला. त्यानंतर या माथेफिरूने बँकेत एकच गोंधळ घातला. सदर माथेफिरू बँकेत शिरल्यानंतर सुमारे पंधरा मिनिटे आरडाओरड करत अराजकता माजवली होती.
ही व्यक्ती बँकेच्या आतील काऊंटरजवळ आरडाओरडा करत होती. त्यामुळे काही काळ बँकेतील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. काही वेळासाठी ग्राहकांना काउंटरपासून दूर राहावं लागलं, तर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
advertisement
संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बँकेतील कर्मचारी आणि ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. या माथेफिरूच्या राड्यामुळे दहशत निर्माण झाली होती. काही जागरूक नागरिक समोर आले आणि त्यांनी या माथेफिरूला पकडलं आणि त्याला चोपही दिला.
त्यानंतर सगळ्यांनी पकडून त्याला बँकेच्या बाहेर काढलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. माथेफिरूला बाहेर काढल्यानंतर बँकेतील कामकाज पूर्वपदावर आलं. मात्र, हा माथेफिरू तरुण कोण होता, कुठून आला होता, याची माहिती अद्याप कळू शकली नाही. या घटनेचा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
