नवी मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकीचा प्रचार रंगात आला असतान मुंबई उच्च न्यायालयातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 (अ) च्या निवडणूकीला मुंबई उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलेले भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात असतानाच प्रभाग क्रमांक १७ (अ) बाबत कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. या प्रभागातील निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असून भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे १५ जानेवारी रोजी या प्रभागात मतदान होणार की नाही, याबाबत सध्या अनिश्चितता निर्माण झाली आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघार प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी अर्ज बाद झाल्याने वाद निर्माण झाले असून काही प्रकरणे थेट न्यायालयात पोहोचली आहेत.
निलेश भोजनेंचा अर्ज का फेटाळला?
प्रभाग क्रमांक १७ (अ) मधून भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या निलेश भोजने यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मालमत्तेवर अनधिकृत बांधकाम असल्याच्या कारणावरून फेटाळला होता. या निर्णयाविरोधात भोजने यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने निर्णय प्रक्रियेवर शंका व्यक्त करत, प्रथमदर्शनी कारवाई योग्य पद्धतीने झालेली नसल्याचे निरीक्षण नोंदवलं. त्यानंतर न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत प्रभाग १७ (अ) मधील निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
दरम्यान, भोजने यांचा अर्ज बाद झाल्यानंतर भाजपने या प्रभागात अपक्ष उमेदवार दर्शन भोईर यांना पाठिंबा देत भूमिका बदलली होती. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप समर्थित उमेदवारांमध्ये थेट लढत रंगली होती.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या एकूण ९५६ नामनिर्देशन अर्जांपैकी ८३९ अर्ज वैध ठरले असून ११७ अर्ज बाद झाले आहेत. प्रभाग १७ (अ) संदर्भातील उच्च न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
