पुतण्याने घरच्यांसमोर काकूचा घेतला जीव
परनाळी येथील आंबात पाडा परिसरात नातेवाईक एकत्र येऊन घरातील एका विषयावर चर्चा करत होते. याच वेळी रमा काशिनाथ दांडेकर (वय 59) यांनी पुतण्या हरेश प्रवीण दांडेकर याला मद्यपान करू नये असे सांगितले. मात्र या साध्या विरोधाचा हरेशला प्रचंड राग आला. संतापाच्या भरात त्याने जवळच असलेल्या कुऱ्हाडीने रमा दांडेकर यांच्या डोक्यात जोरदार वार केला.
advertisement
हा हल्ला इतका गंभीर होता की रमा दांडेकर जागीच कोसळल्या. नातेवाईकांनी त्यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी हरेश दांडेकर घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच तारापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करून परिसरात शोधमोहीम राबवत आहेत.
