ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली सायबर भामट्यांचा धुमाकूळ
कासारवडवली परिसरातील आनंदनगर येथे राहणारे सचिन कुलकर्णी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार 6 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीत फेसबुक मेसेंजरवरून अमन गौतम नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. स्वतःला शेअर मार्केटमधील तज्ज्ञ सल्लागार असल्याचे सांगत त्याने मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले.
शॉर्ट टर्म हंटर्स 116 ग्रुप पडला महागात
advertisement
यानंतर त्याने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तक्रारदारांना शॉर्ट टर्म हंटर्स 116 या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपमध्ये दिव्या मेहरा नावाच्या महिलेने निओ प्रो. नावाचे ट्रेडिंग अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. या अॅपवर गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे खोटे आश्वासन देण्यात आले.
ग्रुपमध्ये वेळोवेळी विविध बँक खात्यांचे क्रमांक पाठवून त्यावर पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. बनावट ट्रेडिंग अॅपवर गुंतवणूक आणि नफा दाखवत तक्रारदाराकडून हळूहळू 1 कोटी 74 लाखांहून अधिक रक्कम उकळण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ना गुंतवलेली रक्कम परत मिळाली ना नफा.
या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
