ठाणे : ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नी आणि त्यांच्या पाच महिन्यांच्या चिमुकल्या मुलीला मारून टाकण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पत्नीने श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
प्रेमविवाहानंतर काही महिन्यांतच...
तक्रारदार महिला या वागळे इस्टेट परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांचा 23 जुलै 2024 रोजी एका 23 वर्षीय तरुणासोबत प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांना एक मुलगी झाली असून ती सध्या पाच महिन्यांची आहे. मात्र, लग्नानंतर पती सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.
पतीचा राग अनावर अन्...
29 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास पती बाहेरून घरी परत आला. त्याने घरी येताच त्याने पत्नीवर संशय घेऊन भांडण सुरू केले. ''तो मुलगा कोण आहे?'' शिवाय ''तुझा त्याच्याशी काय संबंध आहे?'', ''त्याचे नाव सांग'' असे प्रश्न विचारत तो रागाने लाल बुंद झाला. पण यावर पत्नीने उत्तर न दिल्याने पती अधिकच संतापला.
यानंतर त्याने पत्नी आणि मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. ''तुला आणि तुझ्या मुलीला जिवंत सोडणार नाही,'' असे म्हणत त्याने जवळील चाकू उचलून पत्नीच्या अंगावर धाव घेतली. या प्रकारामुळे पत्नी प्रचंड घाबरली. घटनेनंतर पत्नीने श्रीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पतीविरोधात धमकी देणे, शिवीगाळ करणे आणि जीवाला धोका निर्माण करणे या आरोपांखाली गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.
