ठाणे : भिवंडी शहरात नात्यातील विश्वासाला तडा देणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्लीतील 22 वर्षीय तरुणीला शिक्षणाच्या कारणाने भिवंडीत आणल्यानंतर तिच्यावर दोन नातेवाईक भावांनी तब्बल सात वर्षे अत्याचार आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी फरार आहेत.
advertisement
शिक्षणाचं स्वप्न घेऊन मुंबईत आली, पण...
सुदीप उपाध्याय आणि संदीप उपाध्याय अशी गुन्हा दाखल झालेल्या भावांची नावे आहेत. हे भिवंडीमध्ये वास्तव्यास आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी दिल्ली येथे राहत होती. 2018 मध्ये ती दहावीत शिकत असताना सुदीप तिला शिक्षणासाठी मुंबईत घेऊन आला. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचे भासत होते.
दरम्यान सुदीप गावाला गेल्यानंतर संदीपने तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार घडल्यावर पीडितेने सुदीपला संपूर्ण माहिती दिली. मात्र, तिला मदत करण्याऐवजी सुदीपनेच तिच्या अडचणी वाढवल्या. त्याने पीडितेचे आणि संदीपचे संबंध सर्वांना सांगण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
भावांनी तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं
यानंतर दोन्ही भावांनी मिळून 2018 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करत मानसिक त्रास दिला. या सततच्या छळामुळे पीडितेने अखेर दिल्लीतील बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ० नंबरने हा गुन्हा भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी भाऊ फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
