शेअर रिक्षेतील प्रवास पडला महागात
बाळकुळ परिसरात राहणाऱ्या प्रज्ञा मगर (वय 58) या ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी (14 जानेवारी) सकाळी त्या नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मकर संक्रांतचा दिवस असल्याने त्यांनी गळ्यात सोन्याची साखळी त्यावर हिऱ्याचे पेंडल तसेच काही आर्टिफिशल दागिने परिधान केले होते.
advertisement
सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी बाळकुम नाका बस थांब्याजवळून शेअर रिक्षा पकडली. रिक्षा पोलिस आयुक्तालयाच्या दिशेने जात असताना त्यात आधीच काही प्रवासी बसले होते. काही अंतर गेल्यानंतर तीन वर्षांच्या मुलासह एक महिला रिक्षात चढली. प्रवासादरम्यान त्या महिलेने प्रज्ञा मगर यांच्या जवळ बसत संधी साधली आणि अत्यंत चलाखीने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी काढून घेतली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रिक्षातून उतरल्यानंतर गळ्यातील साखळी नसल्याचे लक्षात येताच प्रज्ञा मगर यांनी तत्काळ कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी शेअर रिक्षातून प्रवास करताना दागिने घालताना सावध राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
