वासीत प्रांताचे गव्हर्नर मोहम्मद अल-मियाही यांनी इराकी न्यूज एजन्सीला सांगितले की, मॉलमध्ये आग लागल्यानंतर 60 पेक्षा अधिक लोक जळाले किंवा मरण पावले आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र सुरुवातीच्या अहवालांनुसार ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावरून सुरू झाली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक तास लागले. तर रुग्णवाहिका अविरतपणे जखमी आणि मृतदेहांना रुग्णालयात पोहोचवण्याचे काम करत होत्या.
advertisement
जळालेले मृतदेह आणि भरलेली रुग्णालये
जखमींना कूट शहरातील मुख्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथील जळीतखोर रुग्णांसाठी असलेली युनिट पूर्णपणे भरली आहे. अनेक मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणेही कठीण झाले आहे. मॉलमध्ये सुरक्षा व्यवस्था होती की नाही. यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेनंतर गव्हर्नर यांनी राज्यात तीन दिवसांचा अधिकृत दुखवटा जाहीर केला असून, मॉलचे मालक आणि इमारतीच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सुरक्षेच्या अपुऱ्या उपाययोजनांवर प्रश्न
या दुर्घटनेने पुन्हा एकदा इराकमधील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षाव्यवस्थेची दयनीय अवस्था उघड केली आहे. आग लागल्यास अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितींचा सामना करण्यासाठी देशातील बहुतांश मॉल्स आणि व्यावसायिक इमारतींमध्ये आवश्यक ती साधनसंपत्ती आणि प्रशिक्षण उपलब्ध नसते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा मोठ्या इमारतींना वापरात आणण्यापूर्वी अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असते. पण अनेकदा हे फक्त कागदोपत्रीच पूर्ण केले जाते. आता चौकशी याकडेही वळेल की ह्या हायपर मॉलने सुरक्षेचे नियम पाळले होते की नाही.
एक नवा मॉल आणि मोठी शोकांतिका
कूट येथील हा हायपर मॉल केवळ पाच दिवसांपूर्वीच सुरु झाला होता आणि तो स्थानिक नागरिकांसाठी एक मोठे आकर्षण ठरला होता. सणासुदीच्या दिवसांमध्ये आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये येथे रोज शेकडो लोकांची गर्दी होत होती. दुर्घटनेच्या वेळीही मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर कुटुंबे, महिला आणि मुले उपस्थित होती. काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार आग लागल्यानंतर मोठी गोंधळ उडाली आणि अनेक लोक बाहेरही पडू शकले नाहीत.
इराकमध्ये गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या दुर्घटना वाढल्या आहेत. राजकीय अस्थिरता, प्रशासनाची निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचारामुळे मूलभूत सुरक्षेच्या उपाययोजनांची गंभीर कमतरता दिसून येते. या दुर्घटनेनंतर फक्त एक मॉलच नाही, तर संपूर्ण सरकारी यंत्रणा आणि तिची जबाबदारी देखील सवालांच्या भोवऱ्यात आली आहे.