वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा जुने चेहरे परतताना दिसत आहेत. 2024 च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डेमोक्रॅटिक पक्षाने पहिल्यांदाच मंगळवारी डोनाल्ड ट्रम्पविरुद्ध मोठा विजय मिळवला. न्यूयॉर्क सिटी महापौर पदापासून ते व्हर्जिनिया आणि न्यू जर्सीच्या राज्यपाल निवडणुकांपर्यंत डेमोक्रॅट्सनी रिपब्लिकन पक्षाला चारही राज्यांत पराभूत केलं. दरम्यान कॅलिफोर्नियात गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी रिपब्लिकन राज्यांच्या धर्तीवर तयार केलेले नवीन मतदान क्षेत्र (constituencies) पलटून डेमोक्रॅट्सच्या खात्यात आणखी एक मोठा विजय नोंदवला.
advertisement
मात्र या संपूर्ण घडामोडींना ओबामाचा ट्रम्पवर विजय म्हणून का पाहिलं जातंय? आता अमेरिकेत चर्चेचा विषय बनला आहे. 2028 मध्ये पुन्हा ‘ट्रम्प विरुद्ध ओबामा’ होणार का?
अप्रत्यक्ष ट्रम्प विरुद्ध ओबामा लढत
या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प स्वतः कोणत्याही मतपत्रिकेवर नव्हते, पण त्यांचा पराभव ठळकपणे दिसून आला. अमेरिकेत आजही रिपब्लिकन पक्षाची जिंक-हार थेट ट्रम्पच्या नावाशी जोडली जाते. दुसरीकडे बराक ओबामा स्वतः मैदानात नसतानाही डेमोक्रॅट्सचा विजय ‘त्यांचा विजय’ म्हणूनच मानला जात आहे. कारण त्यांनी या राज्यांतील डेमोक्रॅट उमेदवारांसाठी प्रचार केला होता.
व्हर्जिनियातील अबीगेल स्पॅनबर्गर, न्यू जर्सीतील मिकी शेरिल, आणि न्यूयॉर्कमधील जोहरन ममदानी यांसारख्या उमेदवारांना ओबामाने थेट पाठिंबा दिला होता. कॅलिफोर्नियातील रेडिस्ट्रिक्टिंग मोहिमेतही त्यांनी अप्रत्यक्ष भूमिका निभावली. परिणामी, या अप्रत्यक्ष लढतीत ट्रम्प विरुद्ध ओबामा स्कोअर 4-0 ने ओबामाच्या बाजूने राहिला. त्यामुळे आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 2028 मध्ये खरंच ट्रम्प विरुद्ध ओबामा सामना पाहायला मिळणार का?
ओबामाची पुनरागमनाची चिन्हं
CNN च्या अहवालानुसार ओबामा पुन्हा राजकारणाच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या जवळच्या सूत्रांच्या मते, त्यांच्या प्रसिद्ध घोषवाक्यांतील “Hope and Change” या भावनेत आता थोडीशी चिंता आणि अस्वस्थतेची झलक दिसू लागली आहे.
ओबामाचे जुने सहकारी आणि अमेरिकेचे माजी अटर्नी जनरल एरिक होल्डर यांनी म्हटलं की, ट्रम्प यांनी अमेरिकन संस्थांना आणि लोकशाहीला ज्या प्रकारे धक्का दिला आहे, तो फार खोलवर आहे. आता ओबामासारख्या नेत्यांनी पुन्हा पुढे येण्याची गरज आहे.
ओबामाच्या टीममधील सूत्रांनुसार, ते ट्रम्पच्या वाढत्या प्रभावाला थोपवण्यासाठी नवीन रणनीतीवर काम करत आहेत.
ट्रम्पचा धोका आणि ओबामाची चिंता
जो बायडन यांच्या कार्यकाळात ओबामाने जाणीवपूर्वक राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. जेणेकरून नव्या पिढीतील नेते पुढे येऊ शकतील. मात्र आता त्यांना वाटतंय की ट्रम्प सूडाच्या राजकारणाचा वापर करत आहेत आणि त्यामुळे डेमोक्रॅट्सच्या नव्या नेतृत्वाला पुढे यायची संधी मिळणार नाही.
ओबामाच्या एका निकटवर्तीयाने CNN ला सांगितलं की, ओबामांना भीती आहे की ट्रम्प पुन्हा सत्तेत आले, तर ते संस्थांना इतकं कमजोर करतील की लोकशाहीचं अस्तित्व धोक्यात येईल.
68 वर्षांचे ओबामा, तरी ट्रम्पपेक्षा 15 वर्षांनी तरुण
राजकीय वर्तुळात आता चर्चा आहे की 68 वर्षांच्या वयात ओबामा पुन्हा राष्ट्राध्यक्षीय शर्यतीत उतरतील का? त्या वेळी ट्रम्प 83 वर्षांचे असतील, म्हणजे ओबामा अजूनही 15 वर्षांनी लहान असतील.
सर्वेक्षणांमध्येही ओबामाच आघाडीवर
Overton Insights च्या एप्रिल सर्वेनुसार, 53% अमेरिकन मतदारांनी सांगितलं की- जर ओबामा निवडणूक लढले, तर ते त्यांनाच मत देतील; तर फक्त 47% मतदार ट्रम्पच्या बाजूने होते. Daily Mail–JL Partners च्या जुलै सर्वेमध्येही ओबामाने ट्रम्पला 11% च्या फरकाने मागे टाकलं.
कायदेशीर अडथळा
अमेरिकेच्या संविधानातील 22 व्या दुरुस्तीनुसार, कोणत्याही व्यक्तीला दोन वेळेपेक्षा जास्त वेळा राष्ट्राध्यक्ष होण्याची परवानगी नाही. परंतु ट्रम्प समर्थक आता या नियमाला बायपास करण्याचे मार्ग शोधत आहेत. त्यांचा दावा आहे की ट्रम्प “डमी उमेदवार” सोबत उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात आणि नंतर पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनू शकतात.
यावरूनच आता अमेरिकेत चर्चा रंगली आहे. जर ट्रम्प पुन्हा मार्ग काढू शकतात, तर ओबामा का नाही? आणि म्हणूनच संपूर्ण अमेरिकन राजकारणात आता एकच प्रश्न घुमतोय 2028 मध्ये पुन्हा ट्रम्प विरुद्ध ओबामा अशी लढत खरच होणार का?
