गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन म्हणाले की, चीन नेहमीच टॅरिफच्या गैरवापराला विरोध करत आला आहे आणि यावर आमचा मत स्पष्ट आणि कायमस्वरूपी आहे. हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावर सही करत भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 25% अतिरिक्त शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
भारतावर एकूण 50% टॅरिफ
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण 50% टॅरिफ लावण्याची घोषणा करताना म्हटले की, भारत रशियाकडून तेल खरेदीच्या बाबतीत चीनच्या खूप जवळ आहे आणि आता अमेरिका या विषयावर सेकंडरी निर्बंध लावण्याच्या दिशेने पुढे जाईल.
व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, आपल्याला माहीत आहेच की, आपण भारतावर रशियन तेलप्रकरणी 50% टॅरिफ लावले आहे. ते रशियाकडून तेल खरेदीत चीनच्या खूप जवळ आहेत. भारतावर आधी लावलेला 25% टॅरिफ 7 ऑगस्टपासून लागू झाला आहे. तर नव्याने लावलेला 25% टॅरिफ 27 ऑगस्टपासून म्हणजेच 21 दिवसांनी लागू होईल.
ट्रम्प म्हणाले- भारतावर आता फक्त सुरुवात आहे
PTI या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पत्रकार परिषदेत ट्रम्प यांना विचारण्यात आले की, जर रशिया-युक्रेन यांच्यात करार झाला तर तुम्ही भारतावरचे टॅरिफ हटवाल का?" यावर ट्रम्प म्हणाले-सध्या तरी भारत ५०% कर भरेल, पुढे काय होईल ते पाहू.
जेव्हा ट्रम्प यांना विचारण्यात आले की, चीन आणि तुर्की देखील रशियाकडून तेल खरेदी करत आहेत. तरी भारतावरच एवढी मोठी कारवाई का? यावर ट्रम्प म्हणाले, भारतावर टॅरिफ लावून फक्त 8 तास झाले आहेत. पुढे खूप काही पाहायला मिळेल, सेकंडरी सॅन्क्शन्सचा पूर येईल.
चीन व तुर्कीला सवलत, भारताला शिक्षा?
अमेरिकेने रशियन तेल खरेदीप्रकरणी भारतावर 50% कर लावला आहे. तर चीनवर फक्त 30% आणि तुर्कीवर केवळ 15% टॅरिफ लावले आहे. या भेदभावावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
भारताची तीव्र नाराजी
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) ट्रम्प यांच्या निर्णयाला अत्यंत दुर्दैवी असे म्हणत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रालयाने म्हटले की, अमेरिकेने असा पाऊल उचलणे दु:खद आहे. जेव्हा अनेक अन्य देश देखील राष्ट्रीय हितासाठी तेच करत आहेत जे भारत करत आहे.
MEA ने आपल्या निवेदनात म्हटले की, आमचे मत स्पष्ट आहे. भारताची तेल खरेदी बाजाराच्या परिस्थिती आणि 1.4 अब्ज लोकांच्या ऊर्जा सुरक्षेच्या आधारे केली जाते. हे टॅरिफ केवळ अन्यायकारक नाहीत तर अनुचित आणि अविवेकी आहेत. भारत आपल्या राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल, असा इशाराही परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.
