बीजिंग: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जवळपास 10 मिनिटे वाट पाहिली, जेणेकरून दोघे मिळून शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेच्या स्थळापासून काही अंतरावर आयोजित द्विपक्षीय चर्चेसाठी निघू शकतील. मिळालेल्या माहितीनुसार, पुतिन यांना SCO परिषद स्थळावरून मोदींसोबत प्रवास करायचा होता. त्यासाठी त्यांनी चीनमधील तियानजिन येथे स्थळाबाहेर पंतप्रधान मोदींची प्रतीक्षा केली.
advertisement
पंतप्रधान मोदी आल्यानंतर दोघेही एकाच गाडीतून त्यांच्या द्विपक्षीय बैठकीच्या स्थळाकडे रवाना झाले. त्यांनी प्रवासासाठी पुतिन यांची AURUS लिमोझिन वापरली.
प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी विविध विषयांवर संवाद साधला. इतकेच नव्हे तर बैठकीच्या स्थळी पोहोचल्यानंतरही त्यांनी जवळपास 45 मिनिटे गाडीतच बसून चर्चा सुरू ठेवली.
यानंतर पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट करत लिहिले की- SCO शिखर परिषदेनंतर अध्यक्ष पुतिन आणि मी एकत्र गाडीतून आमच्या द्विपक्षीय बैठकीच्या स्थळी गेलो. त्यांच्याशी संवाद नेहमीच उपयुक्त आणि विचारप्रवर्तक ठरतो.
रशियाच्या राष्ट्रीय रेडिओ स्टेशन VestiFM ने सांगितले की, दोन्ही नेते हॉटेलकडे जात असताना एकांतात संवाद साधत होते. जिथे नंतर त्यांच्या प्रतिनिधी मंडळातील सदस्य सामील होणार होते. मात्र हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतरही त्यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांच्या लिमोझिनमधून बाहेर पडण्याऐवजी आणखी 50 मिनिटे चर्चा सुरूच ठेवली.
नंतर क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनीही पुष्टी केली की- दोन्ही नेत्यांनी गाडीत जवळपास एका तासभर tet-a-tet (एकांतात) चर्चा केली असे वृत्त PTI वृत्तसंस्थेने दिले आहे.
मॉस्कोमधील काही विश्लेषकांनी असेही म्हटले की- कदाचित हीच मोदी आणि पुतिन यांच्यातील सर्वात महत्त्वाची आणि गोपनीय चर्चा ठरली असावी. ज्यामध्ये त्यांनी इतरांच्या कानावर न आणावयाचे मुद्दे मांडले असावेत.
यानंतर झालेल्या द्विपक्षीय चर्चेत पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना स्पष्ट संदेश दिला की- युक्रेन संघर्ष लवकरात लवकर थांबवणे ही मानवतेची मागणी आहे. तसेच मोदींनी हेही नमूद केले की, भारत रशियन अध्यक्षांच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे.