तिराना : जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वर चर्चा मुख्यतः टेक कंपन्या आणि संशोधन प्रयोगशाळांपुरती मर्यादित असताना अल्बानियाने थेट राजकारणात एआयला स्थान दिले आहे. अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी जाहीर केले आहे की त्यांच्या नव्या कॅबिनेटमध्ये एक व्हर्च्युअल मंत्री असेल, ज्याचे नाव आहे डिएला. अल्बानियन भाषेत या नावाचा अर्थ ‘सूर्य’ असा होतो. मात्र डिएला खरा मनुष्य नसून, पूर्णपणे एआयवर आधारित डिजिटल मंत्री आहे.
advertisement
डिएलाचे मुख्य काम सरकारी निधी असलेल्या प्रकल्पांवर देखरेख करणे आणि विशेषत: सार्वजनिक निविदांमधील (Public Tenders) भ्रष्टाचार रोखणे असेल. रामा यांनी ठामपणे सांगितले की, आता पासून आमच्या सर्व निविदा 100 टक्के भ्रष्टाचारमुक्त असतील.
काही महिन्यांपूर्वी डिएलाचा परिचय झाला होता, जेव्हा तिला e-Albania नावाच्या सरकारी डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून सादर केले गेले. विशेष म्हणजे हा एआय अवतार पारंपरिक अल्बानियन लोकरी पोशाख परिधान करून वापरकर्त्यांना सरकारी सेवांची माहिती देतो.
संवैधानिक मान्यता मिळेल का?
अल्बानियातील सत्ताधारी सोशलिस्ट पार्टी ने नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकांमध्ये 140 पैकी 83 जागा जिंकून सलग चौथ्यांदा सत्ता मिळवली आहे. मात्र संविधान दुरुस्ती सारखे मोठे निर्णय घेण्यासाठी त्यांना 93 जागांची गरज आहे. पक्षाने आश्वासन दिले आहे की 2027 पर्यंत अल्बानिया युरोपियन युनियनमध्ये सदस्यत्व मिळवेल, पण विरोधी डेमोक्रॅटिक पार्टी या दाव्याला हवेतली आश्वासने असे संबोधत आहे.
माजी पंतप्रधान साली बेरिशा यांच्या नेतृत्वाखालील डेमोक्रॅटिक पार्टीने निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले असेल तरी त्यांच्या खासदारांनी संसदेच्या उद्घाटन सत्राला हजेरी लावली.
अनोख्या प्रयोगाची सुरुवात
कायदा तज्ज्ञांच्या मते एआय मंत्री डिएलाला अधिकृत दर्जा आणि संवैधानिक मान्यता मिळेल की नाही, याबाबत अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. मात्र रामा सरकारचा दावा आहे की हा प्रयोग केवळ भ्रष्टाचारावर लगाम घालणार नाही, तर अल्बानियाला डिजिटल गव्हर्नन्समध्ये नवे स्थान मिळवून देईल.
1990 मध्ये कम्युनिस्ट राजवटीचा अंत झाल्यानंतर भ्रष्टाचार हा अल्बानियासमोरील सर्वात मोठा प्रश्न राहिला आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की, व्हर्च्युअल मंत्री डिएला खऱ्या ‘सूर्या’सारखी प्रकाशाची किरणे पसरवते की केवळ एक राजकीय शोपीस म्हणून मर्यादित राहते.