चीनमधून उड्डाण करणारी अनेक बोईंग 747 विमानं एकामागोमाग एक इराणकडे जाताना दिसली आहेत. हे सर्व अशा काळात घडत आहे जेव्हा इराण आपल्या अण्वस्त्र ठिकाणांवर इस्रायली हल्ल्यांचा सामना करत आहे. आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की, चीन इराणच्या मदतीसाठी पुढे आला आहे का?
दरम्यान रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराण आणि इस्रायल यांच्यात मध्यस्थी करण्याची ऑफर दिली. त्यांनी हेही स्पष्ट केलं की- इराणने अद्याप त्यांच्याकडे लष्करी मदतीची मागणी केलेली नाही. ट्रम्प यांनी मात्र पुतिन यांच्या मध्यस्थीच्या प्रस्तावाला सध्या नकार दिला आहे. त्यानंतर चिनी अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियन अध्यक्ष पुतिन यांच्यात चर्चा झाली. हे सारे समीकरण मध्य पूर्वेत काहीतरी मोठं घडण्याच्या शक्यतेला चालना देत आहेत.
advertisement
पाच विमानं चीनहून रवाना
FlightRadar24 च्या डेटानुसार, 14 जूनपासून आतापर्यंत किमान पाच बोईंग 747 विमानांनी चीनहून इराणकडे उड्डाण केलं आहे. ही विमानं चीनच्या उत्तर भागातून पश्चिमेकडे उड्डाण करत कझाकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान पार करताच इराणच्या सीमेवर पोहोचल्यावर रडारवरून गायब झाली. रिपोर्ट्सनुसार या विमानांचं अंतिम ठिकाण लक्झेंबर्ग दाखवण्यात आलं होतं. पण एकही विमान युरोपीय हवाई क्षेत्रात प्रवेश करताना दिसलेलं नाही. यामुळे या उड्डाणांच्या हेतूबाबत अधिक संशय निर्माण झाला आहे.
चीन-इराणचा गुप्त करार?
हेरिटेज फाउंडेशनच्या सेंटर फॉर नॅशनल डिफेन्सचे संचालक रॉबर्ट ग्रीनवे यांचं म्हणणं आहे की, चीन आपल्या आर्थिक आणि लष्करी महत्त्वाकांक्षांसाठी मध्य पूर्वेतून स्वस्त, निर्बंधित तेल खरेदी करत असतो आणि इराण त्याच्यासाठी एक महत्त्वाचा भागीदार आहे. त्यांच्या मते ही उड्डाणं कदाचित इराणकडून त्याचे महत्त्वाचे स्रोत, लोक किंवा सामरिक साहित्य चीनच्या मदतीने कुठे तरी हलवण्याचा प्रयत्न असू शकतात.
चीन-इराणमध्ये करार
या ठिकाणी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की- 2021 मध्ये तेहरान आणि बीजिंगने 25 वर्षांच्या धोरणात्मक सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, तेहरान विद्यापीठाचे प्राध्यापक मोहम्मद मरांदी यांचं म्हणणं आहे की, ही भागीदारी अमेरिकासाठी एक स्पष्ट संदेश आहे. जितकं अमेरिका इराण आणि चीन यांना वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करेल. तितकंच हे दोन्ही देश एकमेकांच्या अधिक जवळ येतील.
मात्र अटलांटिक काउंसिलचे संशोधक तुविया गेयरिंग यांचं म्हणणं आहे की, यात काही विशेष असं नाही. त्यांच्या मते- ही लक्झेंबर्ग-आधारित मालवाहू कंपनीची सामान्य उड्डाणं आहेत. जी अनेकदा तुर्कमेनिस्तानमध्ये थांबतात आणि काही ट्रॅकिंग साइट्सना त्यांचा सिग्नल तिथेच हरवतो. ज्यामुळे असं भ्रम निर्माण होतो की ती विमानं इराणमध्ये पोहोचत आहेत.
