‘एक्स’ वरील पोस्टमध्ये झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीचा आढावा शेअर केला. त्यानुसार 24 ते 26 मार्चदरम्यान रशियन उपग्रहांनी मध्य पूर्वेतील अनेक अमेरिकन आणि सहयोगी देशांच्या लष्करी तळांचे आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे फोटो घेतले. यामध्ये सौदी अरेबिया, कतार, कुवैत, तुर्की आणि हिंद महासागर परिसरातील ठिकाणांचा समावेश होता.
झेलेन्स्की यांच्या म्हणण्यांनुसार 24 मार्च रोजी त्यांनी हिंद महासागरातील चागोस द्वीपसमूहातील डिएगो गार्सिया येथे असलेल्या अमेरिका-ब्रिटन संयुक्त लष्करी तळाचे चित्रण केले. त्याच दिवशी कुवैत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ग्रेटर बर्गन तेल क्षेत्रातील काही भागांचेही फोटो घेतले गेले. 25 मार्च रोजी सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान एअर बेसचे फोटो घेण्यात आले. तर 26 मार्च रोजी सौदीतील शायबह तेल-गॅस क्षेत्र, तुर्कीतील इंचिरलिक एअर बेस आणि कतारमधील अल उदीद एअर बेस यांचे चित्रण करण्यात आले.
advertisement
एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की यांनी असेही सांगितले की रशियन उपग्रहांनी 20, 23 आणि 25 मार्च रोजीही प्रिन्स सुलतान एअर बेसचे फोटो घेतले होते. म्हणजेच हल्ल्याच्या काही दिवस आधीच निरीक्षण सुरू होते. 26 मार्च रोजी इराणने या तळावर हल्ला केला, ज्यामध्ये सहा बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि 29 ड्रोनचा वापर करण्यात आला. या तळावर अमेरिकन आणि सौदी सैन्य तैनात आहे.
कतार दौऱ्यावर असताना झेलेन्स्की यांनी ठामपणे सांगितले की, रशियाने इराणला लक्ष्य साधण्यासाठी माहिती पुरवली याबाबत ते 100 टक्के खात्रीशीर आहेत. ते म्हणाले मला वाटते की इराणला मदत करणे हे रशियाच्या हिताचे आहे. आणि मला विश्वास नाही मला माहिती आहे की ते माहिती शेअर करतात. ते इराणला मदत करतात का? नक्कीच. किती टक्के? शंभर टक्के.
युक्रेनच्या अनुभवाच्या आधारे झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले की, एखाद्या ठिकाणाचे वारंवार उपग्रहातून फोटो घेणे हे हल्ल्याच्या नियोजनाचे संकेत असतात. ते म्हणाले, जर ते एकदा फोटो घेतात, तर ते तयारी करत असतात. दुसऱ्यांदा घेतले, तर ते सिम्युलेशन असते. तिसऱ्यांदा घेतले, तर एक-दोन दिवसांत हल्ला होण्याची शक्यता असते.
झेलेन्स्की यांनी रशियावरील निर्बंध शिथिल करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही प्रश्न उपस्थित केला. जर रशिया पाश्चात्य देशांशी संबंधित तळांवर हल्ल्यांना मदत करत असेल; तर निर्बंध कमी करण्याची चर्चा विरोधाभासी वाटते असे त्यांनी म्हटले.
यापूर्वीही रशिया इराणला मध्य पूर्वेतील अमेरिकन सैन्याच्या ठिकाणांची माहिती देत असल्याचे वृत्त आले होते. मात्र रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी हे आरोप फेटाळले. मॉस्कोने तेहरानला कोणतीही गुप्त माहिती दिलेली नाही असे स्पष्ट केले. मात्र दोन्ही देशांमध्ये लष्करी सहकार्य सुरू असल्याचे त्यांनी मान्य केले.
झेलेन्स्की यांचे हे वक्तव्य मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आले आहे. इराण आणि अमेरिकेच्या सहयोगी देशांमधील संघर्ष तीव्र होत असताना, या परिस्थितीचा अप्रत्यक्ष फायदा रशियाला होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले. विशेषतः तेलाच्या किमती वाढल्याने रशियाचे उत्पन्न वाढू शकते आणि पाश्चात्य देशांचे लक्ष व संसाधने युक्रेनपासून दूर जाऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
