काठमांडू/तेल अवीव: इस्रायल-हमास युद्धातील भीषण संघर्षात नेपाळमधील तरुण विद्यार्थी बिपिन जोशी याचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे. त्याच्या मृत्यूने संपूर्ण नेपाळ, तसेच इस्रायलमध्ये त्याच्या परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे. फक्त 23 वर्षांच्या बिपिन जोशीची ही कहाणी केवळ एका विद्यार्थ्याची नाही, तर एका साहसी नायकाची आहे. ज्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले. हमासकडून ठार झालेला तो एकमेव हिंदू आहे.
advertisement
हिमालयाच्या पायथ्यापासून इस्रायलपर्यंतचा प्रवास
बिपिन जोशीचा जन्म हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या नेपाळमधील एका छोट्या गावात झाला. साध्या कुटुंबातील या तरुणाने शिक्षणात प्रगती करून परदेशात जाऊन काहीतरी नवीन शिकण्याचे स्वप्न पाहिले. सप्टेंबर 2023 मध्ये त्याने इस्रायलमधील किब्बुट्झ अलुमीम (Kibbutz Alumim) येथे सुरू असलेल्या कृषी शिक्षण आणि कामाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमांतर्गत ते 16 नेपाळी विद्यार्थ्यांसोबत इस्रायलच्या प्रगत शेती तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेत होते.
किब्बुट्झमध्ये पोहोचल्यानंतर बिपिन तिथल्या संस्कृतीवर आणि लोकांवर प्रेम करू लागले. दररोज तो आपल्या कुटुंबीयांना व्हिडिओ पाठवत होते. शेतात काम करताना, मित्रांसोबत गप्पा मारताना, निसर्गाचा आनंद घेताना. त्याला आधुनिक शेतीचे ज्ञान आपल्या देशात नेऊन नेपाळमधील शेतकऱ्यांना मदत करायची होती. त्याचबरोबर तो हौशी रॅपर होते आणि फुटबॉल खेळणे हा त्याचा आवडता छंद होता.
7 ऑक्टोबरचा भीषण दिवस
मात्र 7 ऑक्टोबर 2023 चा दिवस बिपिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी काळरात्र ठरला. त्या दिवशी हमासने इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर हल्ला केला. सायरन वाजताच बिपिन आणि इतर विदेशी विद्यार्थी किब्बुट्झमधील एका शेल्टरमध्ये आश्रयासाठी धावले. काही क्षणातच बाहेर गोळीबार आणि स्फोटांचे आवाज घुमू लागले.
हमासच्या दहशतवाद्यांनी त्या शेल्टरमध्ये दोन ग्रेनेड फेकले. पहिला ग्रेनेड फुटला आणि काही विद्यार्थी जखमी झाले. पण दुसरा ग्रेनेड फुटण्याआधीच बिपिन जोशीने विलक्षण धैर्य दाखवत तो उचलला आणि बाहेर फेकला. या शौर्यकृतीमुळे अनेकांचे जीव वाचले. मात्र त्यानंतर हमासच्या बंदूकधाऱ्यांनी बिपिनला पकडून गाझामध्ये घेऊन गेले.
इस्रायली लष्कराने नंतर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये बिपिन याला गाझाच्या अल-शिफा हॉस्पिटलमध्ये ओढत नेताना दिसते. हाच त्याचा शेवटचा व्हिडिओ ठरला.
आई आणि बहिणीचा आर्त शोध
बिपिनचे पालक महानंद आणि पद्मा जोशी तसेच त्यांची 18 वर्षांची बहीण पुष्पा यांनी त्याला परत मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी इस्रायल आणि अमेरिकेत जाऊन सरकार व मानवाधिकार संस्थांकडे विनवण्या केल्या. पण दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर 2025 मध्ये बिपिनचा मृत्यू निश्चित झाला.
हमासकडून परत आलेले पार्थिव
हमासने अलीकडेच चार बंधकांचे मृतदेह इस्रायलच्या ताब्यात परत दिले. त्यामध्ये बिपिन जोशी यांचाही समावेश होता. त्याच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी डीएनए तपासणी सुरू आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्याचे पार्थिव नेपाळला पाठवले जाणार असून बिपिनच्या अंत्य संस्काराचे आयोजन इस्रायलमधील नेपाळी दूतावासाच्या समन्वयाने करण्यात येणार आहे.
बंधक कुटुंबीयांचे भावनिक निवेदन
“गाय इलूझ आणि बिपिन जोशी यांच्या कुटुंबियांना आम्ही मनापासून आलिंगन देतो, असे Hostages and Missing Families Forum Headquarters ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या अपार दुःखाच्या क्षणी त्यांना थोडाफार दिलासा मिळावा, हीच आमची प्रार्थना आहे. आम्ही विश्रांती घेणार नाही, जोपर्यंत सर्व 24 बंधक सुरक्षित परत आणले जात नाहीत.
धैर्य आणि मानवतेचा नायक
बिपिन जोशीचे आयुष्य जरी अल्पकाळाचे असले तरी त्याने दाखवलेले धैर्य अमर झाले आहे. त्याने भीतीच्या क्षणी दाखवलेले शौर्य आणि इतरांचे प्राण वाचवण्यासाठी केलेला त्याग मानवतेचा सर्वोच्च आदर्श ठरला. नेपाळमधील एका साध्या घरातून निघालेला हा तरुण आज जगभरातील लोकांच्या मनात “शौर्य आणि करुणेचे प्रतीक” म्हणून स्मरणात राहणार आहे.