काठमांडू/सोनौली : नेपाळमध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेच्या दरम्यान भारत-नेपाळ सीमेवरील सोनौलीजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दगडफेक झाल्याची घटना 9 सप्टेंबर रोजी घडली. या हल्ल्यात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार 49 भारतीय पर्यटकांची ही बस पशुपतिनाथ मंदिरात दर्शन घेऊन काठमांडूहून परत येत असताना अचानक आंदोलकांच्या जमावाने बसला वेढा घालून दगडफेक केली. या घटनेत बसची काच फुटली तसेच प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने काठमांडूतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बसचालक रामू निषाद यांनी सांगितले, आम्ही पशुपतिनाथ दर्शन करून परतत होतो, तेव्हा अचानक आंदोलकांनी कोणत्याही कारणाशिवाय बसवर दगडफेक सुरू केली. महिला आणि वृद्ध प्रवासी असतानाही आंदोलकांनी कोणतीही दया दाखवली नाही. भारतीय दूतावासाने नेपाळ सरकारच्या समन्वयाने उर्वरित प्रवाशांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली.
दरम्यान नेपाळमधील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात मृतांचा आकडा 51 वर पोहोचला आहे, अशी माहिती पोलीस प्रवक्त्याने दिली. हिंसक आंदोलनांदरम्यान अनेक तुरुंगांवर हल्ले होऊन हजारो कैदी पळून गेले. यामध्ये अनेकांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.
सशस्त्र सीमा बलाने (SSB) आतापर्यंत सीमेवर तपासणीदरम्यान वैध ओळखपत्र न दाखवल्यामुळे एका महिलेसह 67 कैद्यांना अटक केली आहे. हे सर्व जण उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालला लागून असलेल्या सीमेवरील तपासणी नाक्यांवरून पकडले गेले.
नेपाळमध्ये हिंसक आंदोलनांमुळे कायदा-सुव्यवस्था पूर्णतः कोलमडली असून, पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी राजीनामा दिल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. अनेक जिल्ह्यांत दंगल, जाळपोळ, तुरुंगांवर हल्ले झाल्यामुळे नेपाळी सैन्याने कर्फ्यू लागू केला आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण असल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्कतेवर आहेत.