39 वर्षीय उरीबे हे एका उद्यानात आपल्या प्रचारसभेत भाषण करत होते. त्याच दरम्यान हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्या पाठीवर आणि डोक्यात गोळी झाडली असल्याची माहिती समोर आली आहे. उरीबे हे रक्तबंबाळ अवस्थेत मंचावर कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर उपस्थितांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. त्यांच्या अंगरक्षकांनी त्वरित प्रतिकार करत हल्लेखोरावर गोळीबार केला. या चकमकीत एका निष्पाप नागरीकही जखमी झाला आहे.
advertisement
व्हिडिओतील दृष्ये तुम्हाला विचलित करू शकतात..
15 वर्षाच्या मुलाला अटक...
बोगोटाचे महापौर कार्लोस गालान यांनी हल्लेखोराला तात्काळ अटक करण्यात आल्याची माहिती दिली. पोलिस सूत्रांनुसार, अटक करण्यात आलेला संशयित फक्त 15 वर्षांचा अल्पवयीन मुलगा आहे. उरीबे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. वैद्यकीय यंत्रणेला 'रेड अलर्ट' वर ठेवण्यात आले आहे.
कोलंबियाचे संरक्षण मंत्री पेद्रो सांचेज यांनी हल्ल्याच्या चौकशीसाठी सर्व शक्य तऱ्हांनी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. हल्ल्याच्या कटात अन्य कुणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.
कोण आहेत मिगेल उरीबे तुर्बाय?
मिगेल उरीबे हे दिवंगत पत्रकार डायना तुर्बाय यांचे पुत्र आहेत. 1991 मध्ये पाब्लो एस्कोबारच्या मेडेलिन कार्टेलने डायना यांचे अपहरण केले होते. बचाव मोहिमेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. ही दु:खद घटना मिगेल यांच्या राजकीय वाटचालीत निर्णायक ठरली. त्यांचे आजोबा जुलिओ सेसार तुर्बाय अयाला हे कोलंबियाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते.
हल्ल्यानंतर कोलंबियातील राजकीय वर्तुळ हादरले असून कोलंबियाचे राष्ट्रपती आणि विरोधकांनी घटनेचा निषेध केला आहे. हा हल्ला केवळ मिगेल उरीबे यांच्यावर नव्हे, तर संपूर्ण लोकशाहीवर असल्याचे म्हटले.
सध्या उरीबे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने या घटनेची सखोल न्यायिक चौकशी करण्याचे आदेश दिले असून, संरक्षण मंत्रालय हल्ल्याच्या मागील हेतू आणि संभाव्य कटाचा तपास करत आहे.