भारताच्या उत्पादनांवर 25% टॅरिफ आणि दंड लावण्याच्या घोषणेनंतर केवळ एकाच दिवसात ट्रम्प यांनी ही घोषणा केली की, अमेरिकेने एक करार केला आहे ज्याद्वारे पाकिस्तानमधील ‘प्रचंड तेल साठे’ विकसित करण्यात अमेरिका मदत करणार आहे.
भारताला पाकिस्तानकडून तेल? ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
ट्रुथ सोशलवर ट्रम्प यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत एक धक्कादायक संकेत दिला – की भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकू शकतो. या विधानामुळे पाकिस्तानच्या 'खऱ्या' तेल क्षमतेवर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि पाकिस्तान सध्या अशा कंपनीची निवड करत आहेत जी या कराराचं नेतृत्व करेल.
advertisement
पाकिस्तानचा सध्याचा तेलसाठा किती आहे?
हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की- ट्रम्प यांच्या दाव्यांनंतरही पाकिस्तानमध्ये 'विशाल' तेलसाठा असल्याचं अद्याप कोणत्याही अधिकृत पातळीवर सिद्ध झालेलं नाही. वास्तव पाहता पाकिस्तानकडे फारच मर्यादित तेल आणि वायू साठे आहेत.
अमेरिकेच्या एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (EIA) आणि वर्ल्डोमीटरनुसार, 2016 पर्यंत पाकिस्तानकडे 353.5 मिलियन बॅरल इतका तेल साठा होता. तेलसाठा असलेल्या देशात ते जगात 52व्या क्रमांकावर होतं. हे साठे त्यांच्या वार्षिक मागणीच्या तुलनेत अगदीच अपुरे आहेत. देशाला सध्या 85% तेल आयात करावं लागतं.
ट्रम्प यांचा ‘विशाल साठा’ कुठून आला?
ट्रम्प यांचे हे विधान सिंधू बेसिनमध्ये झालेल्या अलीकडील भूगर्भीय सर्वेक्षणावर आधारित असण्याची शक्यता आहे. या सर्व्हेत काही हायड्रोकार्बन संरचनांचा अंदाज लागला आहे. काही अंदाजानुसार हे साठे व्हेनेझुएला, सौदी अरेबिया आणि इराणनंतर जगातील चौथे सर्वात मोठे असू शकतात. मात्र हे केवळ तांत्रिकदृष्ट्या शक्यता आहेत. अद्याप कोणतीही व्यावसायिक ड्रिलिंग झाली नाही, ना त्याची शास्त्रीय खातरजमा झाली आहे.
इमरान खानने दाखवले 'तेलाचे स्वप्न'
मार्च 2019 मध्ये इमरान खान यांनी ‘एशियातील सर्वात मोठा’ तेलसाठा असल्याचा दावा केला होता. मात्र काही तासांतच पाकिस्तानच्या पेट्रोलियम विभागाने याचे खंडन करत सांगितले की, त्या परिसरात काहीही सापडले नाही. एक्सॉनमोबिल आणि इतर कंपन्यांनी 5,500 मीटरपर्यंत ड्रिलिंग केलं होतं. मात्र अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत.
विकासासाठी आवश्यक गुंतवणूक आणि अडचणी
या भांडारांचा विकास करणे अत्यंत खर्चिक आहे. तज्ज्ञांच्या मते, विकासासाठी किमान 5 अब्ज डॉलर व 4–5 वर्षे लागतील. शिवाय पाईपलाइन, रिफायनरी, पोर्ट यांसाठी अतिरिक्त भांडवल लागेल. पाकिस्तानचा सध्याचा आर्थिक डोंगर (126अब्ज डॉलरचे परदेशी कर्ज व 17.5 अब्ज डॉलरचा ऊर्जा आयात बिल) ही मोठी अडचण आहे.
पाकिस्तानचे तेल उत्पादनाचे इतिहास
टूट ऑइलफिल्ड (पंजाब): 1960च्या दशकात सापडले. 6 कोटी बॅरलचा साठा असून 12–15%च मिळवता येतो.
लोअर सिंध फील्ड्स (1980): सध्या पाकिस्तानच्या तेल उत्पादनात मोलाचा वाटा.
सुई गॅस फील्ड (बलूचिस्तान): पाकिस्तानचं सर्वात मोठं गॅस क्षेत्र, पण crude oil नाही.
भारताला पाकिस्तानकडून तेल? शक्यता किती?
ट्रम्प यांचा दावा की पाकिस्तान भारताला तेल विकेल – सध्यातरी 'कल्पना' अधिक वाटते. भारत आधीच मध्य पूर्व आणि रशियातून मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. पाकिस्तानकडून भारताला तेल मिळणं हे केवळ एका स्थितीत शक्य आहे. जर तिथे प्रत्यक्षात प्रचंड साठे सापडले, त्यांचं उत्पादन शक्य झालं आणि भारत-पाक संबंध चांगले राहिले.
