एलन मस्क मूळचे दक्षिण आफ्रिकेतील आहेत. त्यांचा जन्म प्रिटोरिया येथे झाला. पण तरुण असताना ते दक्षिण आफ्रिकेतून कॅनडाला गेले होते. 1995 मध्ये ते कॅनडामधून अमेरिकेत आले.
वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, मस्क यांना 1989 मध्ये कॅनडाची नागरिकत्व मिळाले होते. त्यांनी कॅनडाच्या क्वीन्स युनिव्हर्सिटीत शिक्षण सुरू केले आणि नंतर 1992 मध्ये ते अमेरिकेत गेले. त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत प्रवेश घेण्यासाठी अमेरिका गाठली होती. मात्र शिक्षण पूर्ण करण्याऐवजी त्यांनी अमेरिकेतच आपली पहिली कंपनी Zip2 सुरू केली.
advertisement
एलन मस्क अमेरिकेत विद्यार्थी व्हिसावर (J-1 किंवा F-1 व्हिसा) आले होते. स्टॅनफोर्डमध्ये प्रवेशासाठी त्यांनी हा व्हिसा घेतला होता. या व्हिसावर काम करण्यासाठी कडक अटी असतात. मस्क यांनी व्हिसा मिळाल्यानंतर शिक्षण पूर्ण केले नाही आणि Zip2 वर काम सुरू केले. त्यामुळे त्यांनी व्हिसाच्या अटींचा भंग केला. विद्यार्थ्यांच्या व्हिसावर परवानगीशिवाय स्टार्टअपवर काम करण्याची परवानगी नसते.
मग मस्क यांना अमेरिकेची नागरिकता कशी मिळाली?
रिपोर्टनुसार मस्क यांनी 1997 मध्ये H-1B व्हिसा घेतला. जो विशिष्ट व्यावसायिक कामांसाठी दिला जातो. या व्हिसामुळे त्यांना Zip2 मध्ये कायदेशीररित्या काम करता आले. त्यानंतर मस्क यांनी ग्रीन कार्ड मिळवले. 2002 मध्ये त्यांनी नेचुरलायझेशन प्रक्रियेद्वारे अमेरिकेची नागरिकता घेतली. या प्रक्रियेमध्ये अनेक वर्षे ग्रीन कार्डधारक म्हणून वास्तव्यास राहणे, नागरिकत्वाची परीक्षा देणे आणि कोणतेही मोठे गुन्हे किंवा इमिग्रेशन उल्लंघन न केलेले असणे आवश्यक असते.
वॉशिंग्टन पोस्टने 2024 मध्ये दिलेल्या माहितीनुसार, मस्क यांनी 1995 मध्ये स्टॅनफोर्डमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेतला नाही आणि त्यांनी Zip2 वर काम सुरू केले. जे त्यांच्या स्टुडंट व्हिसाच्या अटींचा उल्लंघन होते. Zip2 च्या गुंतवणूकदारांना 1996 मध्ये त्यांच्या इमिग्रेशन स्थितीबद्दल चिंता वाटली होती आणि त्यांनी 45 दिवसांच्या आत आपली स्थिती स्पष्ट करण्याची अट ठेवली होती. असे न केल्यास गुंतवणूक परत घेण्याचा इशारा दिला होता.
तसेच 2005 मध्ये एका मानहानीच्या खटल्यात मस्क यांनी एका ईमेलमध्ये कबूल केले होते की- स्टॅनफोर्डमध्ये अर्ज केल्याव्यतिरिक्त त्यांच्या अमेरिकेत राहण्याचा कोणताही कायदेशीर आधार नव्हता. ज्यावरून असे स्पष्ट होते की त्यांना स्वतःच्या स्थितीबद्दल माहिती होती.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मस्क यांनी स्टॅनफोर्डमध्ये प्रवेश न घेणे आणि Zip2 वर काम करणे, हे तांत्रिकदृष्ट्या त्यांच्या व्हिसाच्या अटींचे उल्लंघन होते. मात्र 1990च्या दशकात इमिग्रेशन नियम आजच्या इतके कडक नव्हते.
मस्क यांची नागरिकता रद्द करून त्यांना डिपोर्ट करता येईल का?
अमेरिकन कायद्यानुसार, नैसर्गिकरित्या मिळवलेली नागरिकता (Naturalized Citizenship) रद्द केली जाऊ शकते. यासाठी हे सिद्ध करावे लागेल की नागरिकत्वासाठी महत्त्वाच्या गोष्टी जाणीवपूर्वक लपवण्यात आल्या किंवा खोटे बोलण्यात आले. जर मस्क यांनी 2002 मध्ये नागरिकत्वासाठी अर्ज करताना 1995 ते 1997 दरम्यानच्या त्याच्या बेकायदेशीर कार्यांविषयी माहिती लपवली असेल तर सैद्धांतिकदृष्ट्या त्यांची नागरिकता रद्द केली जाऊ शकते.
यासाठी सरकारला हे सिद्ध करावे लागेल की मस्क यांनी जाणूनबुजून चुकीची माहिती दिली. जी त्यांच्या नागरिकत्वासाठी निर्णायक होती. जर मस्क यांची नागरिकता रद्द झाली तर ते आपोआप कॅनडाचे नागरिक ठरतील आणि त्यामुळे त्यांना कॅनडाकडे डिपोर्ट केले जाऊ शकते.
