मॉस्को: रशियातील मान्सियस्क या शहरात एक साधा फॅक्टरी कामगार व्लादिमीर रिचागोव अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला. कारण त्याच्या बँक खात्यात चुकून तब्बल 7.1 मिलियन रूबल म्हणजेच जवळपास 87 लाख जमा झाले. वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा व्लादिमीरने आपल्या मोबाईल बँकिंग अॅपवर नोटिफिकेशन पाहिलं, तेव्हा तो अवाक् झाला. त्याला सुट्टीच्या भत्त्यापोटी फक्त 58,000 (सुमारे 46,000 रूबल) मिळायचे होते, पण त्याच वेळी खात्यात सात मिलियनहून जास्त रूबल आले होते. कंपनीकडून मोठा बोनस मिळणार असल्याची अफवा आधीच होती, त्यामुळे व्लादिमीरला वाटलं की हीच ती बोनस सॅलरी असावी.
advertisement
मात्र काही तासांतच कंपनीच्या अकाउंटिंग विभागाकडून फोन येऊ लागले आणि त्याला सांगण्यात आलं की हे पैसे चुकून ट्रान्सफर झाले आहेत आणि ते परत करावे लागतील. हे ऐकून तो अस्वस्थ झाला, पण त्यानंतर त्याने असा निर्णय घेतला की सगळे थक्क झाले. व्लादिमीरने इंटरनेटवर कायदा वाचला आणि ठरवलं की तो पैसे परत देणार नाही. त्याचं म्हणणं होतं की- "जर ही तांत्रिक चूक असेल तर मी परत करेन, पण जर बिलिंग एरर असेल, तर ते पैसे माझेच आहेत. नंतर समजलं की हे तांत्रिक कारणामुळे झालं होतं. कंपनीच्या दुसऱ्या शाखेतील 34 कर्मचाऱ्यांची सॅलरी चुकीने व्लादिमीरच्या खात्यात गेली होती. पण तरीही त्याने दावा केला की पैसे कंपनीच्या नावाने आले आहेत आणि पेमेंट ऑर्डरवर ‘सॅलरी’ असं लिहिलं आहे, त्यामुळे हे माझेच पैसे आहेत.
कंपनीने जेव्हा दबाव आणला, तेव्हा व्लादिमीरने त्या पैशातून नवीन कार खरेदी केली आणि आपल्या कुटुंबासोबत दुसऱ्या शहरात स्थलांतर केलं. हे समजताच कंपनीने त्याच्यावर केस दाखल केली आणि त्याचं बँक अकाउंट फ्रीझ करून घेतलं. न्यायालयाने आणि अपील कोर्टाने कंपनीच्या बाजूने निर्णय दिला आणि आदेश दिला की व्लादिमीरने ते 7 मिलियन रूबल परत करावेत. पण व्लादिमीर अजूनही ठाम आहे. त्याने आता रशियाच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अपील दाखल केलं असून, तो आजही म्हणतो, "हे पैसे माझेच आहेत."
कंपनीचे सीईओ रोमन तुदाचकोव यांनी सांगितलं की हा ट्रान्सफर आमच्या सिस्टिममधील तांत्रिक त्रुटीमुळे झाला, कोणताही बोनस नव्हता. आम्ही हा प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवू. यापूर्वी चिलीमध्येही असाच प्रकार घडला होता. तेथे एका कर्मचाऱ्याला चुकून त्याच्या पगाराच्या 286 पट जास्त रक्कम मिळाली होती आणि तो कर्मचारी ते पैसे घेऊन गायब झाला.
