इस्लामाबाद : पाकिस्तानमधील बलुचिस्तान भाग फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या सैन्यासाठी नरक ठरत आहे. या भागातील बंडखोर इतके शक्तिशाली झाले आहेत की पाकिस्तानी सैन्य त्यांच्यासमोर काहीच करू शकत नाही. अलीकडेच बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) बलुचिस्तानातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या आठ हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्याचे किमान आठ जवान ठार झाले असून डझनभर वाहने उद्ध्वस्त झाली आहेत. मोठ्या संख्येने सैनिक जखमी झाल्याने त्यांचा मनोबल खचला आहे. त्यामुळे बलुचिस्तानात तैनातीला जाण्यास पाकिस्तानी सैनिक घाबरत आहेत. तर दुसरीकडे सेना प्रमुख असीम मुनीर परदेशात फिरून मोठ्या गप्पा मारत आहेत.
advertisement
बीएलएची कबुली
शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात बीएलएचे प्रवक्ते जियंद बलुच यांनी सांगितले की- त्यांच्या लढवय्यांनी पंजगुर, कच्छी, क्वेटा, जीवानी, खरान, बुलेदा आणि दलबंदिन या जिल्ह्यांत हल्ले केले. यात त्यांनी सैन्याचे ताफे, पोलिसांच्या गस्त पथकांना आणि पुरवठा वाहनांना लक्ष्य करण्यासाठी आयईडी, ग्रेनेड आणि थेट गोळीबार यांचा वापर केला.
रिमोट कंट्रोलने मोठा स्फोट
सर्वात मोठा हल्ला गुरुवारी पंजगुर जिल्ह्यातील पारोम भागात केला. एका चौकीवरून निघत असताना पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या वाहनावर रिमोट कंट्रोल आयईडीद्वारे हल्ला करण्यात आला. यात पाकिस्तानी सैन्याचे सहा जवान ठार झाले आणि अनेक वाहने पूर्णपणे नष्ट झाली. याशिवाय डझनभर सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. कच्छी जिल्ह्यात कोलपूर भागातील रेल्वे ट्रॅकवर गस्त घालणाऱ्या बॉम्ब निष्क्रिय पथकावरही हल्ला करण्यात आला, यात एक सैनिक ठार झाला.
सैनिकांकडून रायफल हिसकावल्या
२८ ऑगस्ट रोजी कच्छी जिल्ह्यात बीएलएने केलेल्या आणखी एका कारवाईत पाकिस्तानी सैन्याला मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला. क्वेट्यातील मियां घुंडी भागात बीएलए लढवय्यांनी पोलिसांना काही काळ बंदिवान बनवून त्यांच्याकडील तीन कलाश्निकोव्ह रायफल काढून घेतल्या आणि नंतर त्यांना सोडून दिले. ग्वादर जिल्ह्यातील जीवानी भागात पाकिस्तानी सैन्याच्या छावणीवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला.
पाकिस्तानी गुप्तहेराची हत्या
बीएलएने 21 ऑगस्ट रोजी खरान येथे एका व्यक्तीची हत्या केली. त्याच्यावर पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी हेरगिरीचा आरोप होता. 23 ऑगस्टला केच जिल्ह्यातील बुलेदा येथे त्यांनी तीन पुरवठा ट्रक आणि एक क्रेन उडवून दिली. याशिवाय चगाई जिल्ह्यातील दलबंदिन भागातही अनेक पुरवठा ट्रकांना आग लावण्यात आली.