रशियाच्या तपास समितीने टेलिग्रामवर दिलेल्या निवेदनानुसार, स्टारोव्हॉयट यांचा मृतदेह मॉस्कोजवळील ओडिंत्सोव्हो जिल्ह्यात त्यांच्या वैयक्तिक कारमध्ये गोळी लागलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेच्या परिस्थितीचा तपास सध्या सुरू असून, प्राथमिक माहितीवरून आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अधिकृत तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.
ही नाट्यमय घटना त्याच दिवशी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत घोषणेनंतर घडली. ज्यामध्ये रोमन स्टारोव्हॉयट यांना परिवहन मंत्रिपदावरून हटवल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र क्रेमलिनकडून त्यांच्या बडतर्फीचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही.
advertisement
स्टारोव्हॉयट यांची मे 2024 मध्ये परिवहन मंत्री म्हणून नेमणूक झाली होती आणि त्यांनी तब्बल एका वर्षापर्यंत ही जबाबदारी सांभाळली. त्याआधी त्यांनी जवळपास पाच वर्षे युक्रेनला लागून असलेल्या कुर्स्क प्रदेशाचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. त्यांचा मंत्रीपदाचा कार्यकाळ रशियाच्या वाहतूक क्षेत्रासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरला. कारण युक्रेन युद्धाच्या चौथ्या वर्षात हे क्षेत्र मोठ्या तणावाखाली होते, असे रॉयटर्सने म्हटले आहे.
या घटनेनंतर लगेचच अध्यक्ष पुतिन यांनी नोव्हगोरोड प्रदेशाचे माजी राज्यपाल आंद्रेई निकितिन यांची कार्यवाहक परिवहन मंत्री म्हणून नियुक्ती केली. क्रेमलिनने यासंदर्भातील घोषणा केल्यानंतर लगेचच पुतिन आणि निकितिन यांच्यात झालेल्या हस्तांदोलनाचे फोटोही प्रसिद्ध केले.
नवीन मंत्र्याच्या झपाट्याने झालेल्या निवडीबाबत विचारले असता क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, पुतिन यांना वाटते की निकितिन यांचा अनुभव आणि कौशल्ये मंत्रालयाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य आहेत. त्यांनी परिवहन मंत्रालयाला सध्याच्या राष्ट्रीय गरजांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे वर्णन केले.
